सगळेच निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला?

0
19

छत्रपती संभाजीनगर, दि. ३1 ( पीसीबी ) –: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल सुनावत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ संशयामुळे आरोपींना दोषी धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तब्बल 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर दोन्ही बाजूने विविध प्रतिक्रिया उमटत असून एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तत्कालीन राज्य सरकारसह या प्रकरणातील आरोपी असलेल्या साधी प्रज्ञासिंह यांना निवडणुकीत तिकीट देणाऱ्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. सगळेच निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला?” असा खरपूस सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.

न्यायालयाच्या निकालावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, “हेमंत करकरे हे सुरुवातीला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काम पाहत होते. देशातील एक चांगले अधिकारी अशी हेमंत करकरे यांची ओळख होती. पण दुर्दैवाने नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलं होतं. मात्र त्यांची हत्या करण्यात आली. मालेगाव घटनेच्या नंतर हिंदू दहशतवाद असा एक शब्द समोर आला होता. एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरंच निर्दोष असत्या तर त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंमत कोणामध्ये होती? तसंच आजच्या निकालाप्रमाणे तेव्हा आर्मीत सक्रिय असणारे लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना कोणी अडकवलं? या निकालामुळे देशाच्या सर्व न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भाजपने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा राजकीय फायदा उचलण्यासाठी भोपाळसारख्या एका राज्याच्या राजधानीत साध्वी प्रज्ञासिंह यांना तिकीट देऊन निवडून आणलं, त्यांची पात्रता काय होती? त्यांची पात्रता एवढीच होती की, त्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपी होत्या. आमच्याकडे आता काही चांगले लोक राहिलेले नाहीत, जे आरोपी आहेत त्यांना आम्ही तिकीट देऊन लोकसभेत बसवणार, असा मेसेज भाजपकडून देण्यात आला होता,” असा घणाघात जलील यांनी केला आहे.