देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्या

0
24

खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाच्या महानिदेशकांडे मागणी

पिंपरी, दि. २९ – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निधीअभावी मागील चार वर्षांपासून विकास कामे रखडली आहेत. या भागातील विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. संरक्षण विभागाने निधी द्यावा अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण विभागाचे महानिदेशक एस.एन.गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत या नागरिकांना भेटतही नसल्याची तक्रारही त्यांनी केली.

खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण विभागाचे महानिदेशक एस.एन.गुप्ता यांची भेट घेतली. देहूरोडच्या विकासाबाबत निधी देण्याची मागणी केली. देहूरोडमध्ये कोणती कामे रखडली आहेत. याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. देहूरोडमध्ये मागील चार वर्षांपासून नगरसेवक नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज केले जाते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत या नागरिकांना भेटत नाहीत. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांची किरकोळ कामेही होत नाहीत. चार वर्षांपासून विकास कामे रखडली आहेत. रस्ते, स्ट्रीट लाईट, पिण्याचे पाणी, प्रदूषण, सार्वजनिक स्वच्छतागृहा निर्माण करावे. शेलारवाडीत श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय निर्माण करावे.

शीतळानगर येथील श्रीराम मंदिर परिसरात उद्यान, योग, ध्यान केंद्र, वॉकिंग ट्रॅक, सांस्कृतीक सभागृह उभारावे. लहान मुले, युवकांना धावण्यासाठी धावपट्टी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, क्रिकेट आदी खेळांसाठी मैदान विकसित करावे. देहूरोड बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवावे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यान विकसित करावे. या दोन्ही कामासाठी मान्यता आणि निधी द्यावा. शेलारवाडी येथील अमरजाई देवी पालखी मार्गावर स्वागत कमान उभारावी. त्याला गावातील अध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते नबाजी भाऊगुजे शेलार यांचे नाव द्यावे. या कामासांठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली आहे