लोढा सोसायटीत सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण

0
53

दि. २८ ( पीसीबी ) – अलीकडच्या काळात सातत्याने खून, मारामाऱ्या, कोयता गँगची दहशत अशा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात भाईगिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलासोबत वाद घातला म्हणून एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील गहूंजे येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीत ही घटना घडली आहे. किशोर भेगडे असे या आरोपीचे नाव आहे.

किशोर भेगडे हा मावळ विधानसभेची निवडणूक लढलेल्या बापू भेगडे यांचा पुतण्या आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून किशोर भेगडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. काल सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत होते. खेळता-खेळता अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. ही गोष्ट किशोर भेगडेला समजली, मग त्याने मुलाच्या मित्रांना गाठले अन त्यांना बेदम मारहाण केली.

भांडणावेळी या मुलांनी एकमेकांना शिवीगाळ गेली. त्यामुळे हा वाद वाढला. हा प्रकार समजल्यानंतर किशोर भेगडे हा तडक सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये गेला. तिकडे संबंधित मुलं दिसताच किशोर भेगडे याने त्यांना दरडावले आणि मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये किशोर भेगडे एका अल्पवयीन मुलाला मारताना दिसत आहे. किशोर भेगडे याने त्याच्या पोटात फाईट मारल्याचेही व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. हा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे लोक किशोर भेगडे याला थांबवण्याचा आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याप्रकरणी 15 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी किशोर भेगडे याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर भेगडे हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्याला अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.