दि . २८ ( पीसीबी ) – पुण्यातील खराडी परिसरातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. खराडीतील ‘स्टेबर्ड अझुर सूट’ या हॉटेलमध्ये ही हाऊस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत कोकेन आणि गांजासदृश पदार्थ सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे अडचणीत आले होते. परंतु, आता या सगळ्याबाबत प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावे केले आहेत.
ड्रग्ज पार्टी म्हणजे बालिशपणा वाटतो. एका फ्लॅटमध्ये जमल्यावर त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचा अमली पदार्थ सेवन केला नाही, हे रक्त तपासणी अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. खेवलकर यांच्यावर पूर्वनियोजित पद्धतीने दोन वेळा ट्रॅप रचले गेले होते. संपूर्ण प्रकरण बनावट आहे, असा दावा वकील विजयसिंह ठोंबरे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.
एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी रेव्ह पार्टी छापाप्रकरणात एक गंभीर आरोप केला आहे. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा या रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना कॉल करून त्याठिकाणी बोलवण्यात आले होते. यानंतर त्याठिकाणी छापेमारी करून त्यांना पकडण्यात आलं, असा दावा मनीष भंगाळे यांनी केला आहे. या प्रकरणात ज्या तांत्रिक बाबी माझ्यासमोर आल्या आहेत. जी माहिती मी गोळा केली आहे. त्यानुसार, याप्रकरणात खेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप अडकवण्यात आले आहे. या प्रकरणाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता. त्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते या जाळ्यात अडकले. त्यांचा या रेव्ह पार्टीशी कसलाही संबंध नाही. पार्टीतील लोकांनाही ते ओळखत नाहीत. यापूर्वी ते पार्टीतील लोकांच्या संपर्कात देखील नव्हते. एक-दोन दिवसांत पुणे पोलिसांना मी या सर्व गोष्टी सांगणार आहे. पुणे पोलिसांनी चौकशी केली आणि प्रांजल खेवलकर यांचे कॉल रेकॉर्डस आणि इतर गोष्टी तपासून पाहिल्यास त्यांच्याविरोधात रचण्यात आलेला कट स्पष्ट होईल, असा दावा मनीष भंगाळे यांनी केला.