तुझा बाप दिल्लीत बसलाय अमित शाहा तो ठरवेल…

0
8

दि . २८ ( पीसीबी ) – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत, असे म्हटले होते. आता एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जबरदस्त टोला लगावला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. चार मंत्र्‍यांना जावं लागणार आहे. योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हे उद्या कळेल. अमित शहांनी ताकद दिली नसती तर शिंदे यांचे काय झाले असते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“प्रत्येक अनैतिक गोष्टीमागे एकनाथ शिंदे असतात. त्यामुळेच ते इतके आमदार जमा करु शकले. अनैतिक कृत्यात सहभागी झालेल्यांना सरंक्षण दिले जाते. त्यामुळेच ते इतके आमदार देऊ शकले. यांचा पक्षाला चोर, दरोडेखोरांचा पक्ष आहे. यात कोणती नैतिकता, कोणती संस्कृती, कोणता संस्कार काहीही नाही. तुझा बाप दिल्लीत बसलाय अमित शाहा तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार, अमित शाह ठरवणार, एकनाथ शिंदे ठरवणार नाही”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

“तुम्ही डरपोक लोक आहात. तुम्ही पळून गेलेले लोक आहेत. हे सर्व अनैतिक कृत्यात सहभागी झालेले, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेले असे लोक घेऊन तुम्ही पळून गेला. जर तुमच्यात एवढी हिंमत होती तर तुम्हाला परत मुख्यमंत्रीपद का मिळालेले नाही, तुम्हाला मुख्यमंत्रि‍पदाचे वचन दिले होते, मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री का झाला नाहीत, तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री का केले नाही”, असा सवालही संजय राऊतांनी विचारला.

त्यात राजकारण आणू नये
“उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. राज ठाकरे यांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्यात त्या ट्वीटरवर आहेत. मी माझ्या मोठ्या बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलो. मातोश्री आजदेखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान आहे. मी स्वत तिथे उपस्थित होतो. त्यामुळे तिथे काय झाले, काय चर्चा झाली याचा मी साक्षीदार आहे. कालचा दिवस हा दोन भावांमधील नात्याला अधिक घट्ट करणारा दिवस होता. त्यात राजकारण आणू नये”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

“एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरल्याचा प्रयत्न केल्यावर किंवा अमित शाहा यांनी शिवसेनेवर दरोडा टाकून त्या दरोड्याचा माल हा शिंदेंच्या हाती सोपवल्यावर एकमेव राज ठाकरे होते, त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेंची कशी होऊ शकते. हे हास्यास्पद आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची आहे. आमचे राजकीय मतभेद असतानाही त्यावेळी राज ठाकरेंनी हे विधान जाहीरपणे करणारे ते एकमेव नेते होते. त्यामुळे त्यांच्या भावना तुम्ही घेतल्या पाहिजेत, त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना पक्षप्रमुख आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातात चोरीचा माल आहे. त्यांच्याकडे जो माल आहे तो ते चोरीचा माल ते सांभाळत आहेत. हा चोरीचा माल कधीही मुद्देमालासह जप्त होऊ शकतो. सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील ते कळेल. हा चोरलेला मुद्देमाल कधीही जप्त होईल. पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवस आणि एखाद्या महत्त्वाच्या वेळी फोन करू शकतात. त्यात वेगळं काय नाही”, असेही संजय राऊतांनी म्हटले.