जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या

0
23

पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे अंतिम वर्षातील १,७२२ विद्यार्थ्यांसाठी १,५९३ नोकऱ्या

पिंपरी, दि . २६ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील १,७२२ विध्यार्थ्यांसाठी आतापर्यंत १,५९३ नोकऱ्या मिळाल्या आहेत. पुढील सहा महिन्यात आणखी नोकरी मेळावे होणार आहेत अशी माहिती पीसीईटी, नूतन सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी पीसीईटीच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे.
विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या आयटी कंपन्यात झाली आहे. यामध्ये कॅपजेमिनी (३५६), ॲक्सेंचर (२४३), टेक महिंद्रा (१२८), एलटीआय माईंड ट्री (७७), केपीआयटी (६५), कॉग्निझंट (५२) या कंपन्यांचा समावेश आहे.तसेच आयटी प्रॉडक्ट कंपन्यानी खूपच आकर्षक वार्षिक पगार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये लिंक्डइन (६० लाख रुपये), अ‍ॅमेझॉन (४७.८८ लाख रुपये), कॉमव्हॉल्ट सिस्टिम्स (३३ लाख रुपये), लेमा (३० लाख रुपये) तर पीसीईटीच्या विद्यार्थ्याला आतापर्यंतचे सर्वाधिक वार्षिक पॅकेज उबेर कंपनीतील ६१ लाख रुपये देण्यात आले आहे.
तसेच रोजगाराच्या संधी दिलेल्या इतर कोअर मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमध्ये फिलिप्स, महिंद्रा अँड महिंद्रा, डसॉल्ट सिस्टिम्स, टाटा टेक्नॉलॉजीज, ऍटलस कॉप्को, गोदरेज, मिंडा, अल्फा लावल या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.
पीसीईटीचे सेंट्रल प्लेसमेंट सेल कॅम्पस इंटरव्यू मध्ये दरवर्षी विध्यार्थ्यांना सुमारे ३५० नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी उपलब्ध करून देते.
निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी, डॉ. जहागीरदार, डॉ. सपली, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
पीसीईटी, नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. दीपक पवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. हीना शर्मा, प्रा. डेन्झेटा लोबो, मंगेश काळभोर सर्व विभागातील ट्रेनिंग प्लेसमेंट चे शिक्षक प्रतिनिधी व २०० हुन अधिक विध्यार्थी प्रतिनिधी यांनी वेळोवेळी रोजगार मेळाव्याच्या आयोजनात योगदान दिले.