हृदयद्रावक घटना! क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
12

इंदापूर दि . २६ ( पीसीबी ) : क्रिकेट खेळताना 32 वर्षे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. 25) गलांडवाडी नंबर दोन (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरण युवराज चव्हाण (वय-32, रा. सरडेवाडी, जाधव वस्ती ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर बाह्यवळण परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी किरण यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्या ठिकाणी उपस्थित तरुणांनी त्यास तात्काळ उपचारासाठी इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगीतले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता किरण यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, याबाबत किरण चव्हाण यांचा मावस भाऊ यांनी विठठल अजिनाथ महाडीक (व्यवसाय-शेती, रा. सरडेवाडी, जाधव वस्ती, ता. इंदापुर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार आप्पा हेगडे करत आहेत.