सुमित फॅसिलिटीज कंपनी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार

0
15

मुंबई,दि . २६ ( पीसीबी ) – देवेंद्र फडणवीसांनी विरोधक जे बोलतात ते गांभीर्याने घ्यावे, अन्यथा एक दिवस झारखंडचे पोलीस महाराष्ट्रात येतील आणि तुमच्या एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करुन घेऊन जातील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. सुमित फॅसिलिटीज कंपनी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन हे सामाजिक सेवा करण्यासाठी चालवले जात असल्याचे दाखवले जात आहे, मात्र या फाऊंडेशनसाठी आलेला पैसा हा भ्रष्ट मार्गाने येतो आणि समाजसेवेच्या नावाने ब्लॅक मनी व्हाईट केला जातो, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

मुंबईतील रेस्टॉरंट्स शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांसोबत बोलत होते, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी झारखंड मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेला सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक अमित प्रभाकर साळुंखे याचे शिंदे पिता-पुत्रासोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला. शिंदे पिता-पुत्रांच्या आशीर्वादानेच सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कंत्राटे मिळत होती, या सर्व कंत्राटांची निष्पक्ष चौकशीची मागणी शिवेसना ठाकरे गटाने केली आहे.

अमित साळुंखे यांच्या सुमित फॅसिलिटीजला मोठमोठे कंत्राट गैरमार्गाने देण्याचे काम शिंदे पिता-पुत्रांनी केले आहे. अमित साळुंखे यांचा मद्य घोटाळा समोर आला, त्यामध्ये झारखंड एसीबीने त्याला अटक केली. याच व्यक्तीला महाराष्ट्र सरकारने 108 रुग्णवाहिकांचे कंत्राट दिले आहे. यामध्ये 800 कोटींचा घोटाळा झाला आहे, हे आतापर्यंत सर्वांनी सांगितलं आहे. सुमित फॅसिलिटीजला कंत्राट मिळण्यासाठी शिंदे पिता-पुत्रांनी कशी मदत केली हेही आता उघड होत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा कंत्राट नियमबाह्य पद्धतीने घाईघाईने शिंदे पिता-पुत्राकडून देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. केडीएमसी घनकचरा हे कंत्राट 850 कोटींचे आहे. यांचे सर्व व्यवहार हे 800 ते 850 कोटींच्यावर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
सुमित फॅसिलिटीज या कंपनीला धडाधड कंत्राट मिळत गेले, नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कंत्राट दिले गेले. यामध्ये नाव सुमित फॅसिलिटीजचे असले तरी याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत. झारखंडमधील मद्य घोटाळ्यातील पैसा आणि या सर्व टेंडर घोटाळ्यातील पैसा हा श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला येतो. त्यामाध्यमातून ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम येथे चालू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना या सर्व प्रकाराचे गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत हे विसरुन जायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रातील 800 कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा आणि 850 कोटींचा कल्याण डोंबिवली घनकचरा घोटाळा याच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.