दि . २६ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड येथील महासाधू श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेला उत्साह आणि भक्तिमय वातावरणात गुरुवारपासून प्रारंभ झाला.
द्वारयात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मंगलमूर्तीची विधीवत पूजा करून त्यांना दुर्वा वाहण्यात आल्या. त्यानंतर चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधीचे दर्शन घेऊन द्वारयात्रा पुर्वद्वार श्री मांजराई देवी मंदिराकडे वाजतगाजत मार्गस्थ झाली. त्यावेळी यात्रेत १५० भाविक सहभागी झाले. एम्पायर इस्टेट येथील मांजराई देवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने संजय साळवी व अन्य विश्वस्तांनी यांनी द्वारयात्रेचे स्वागत केले. यानंतर श्री मांजराई देवी मंदिरात देवीचे पूजन करून गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी परंपरेप्रमाणे करण्यात आले. यानंतर परत चिंचवड येथे येऊन श्रीचिंतामणी समाधी मंदिरासमोर धुपारती म्हणण्यात आली. त्यानंतर श्री मंगलमुर्ती वाड्यात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दि.२६ जुलै रोजी दक्षिणद्वार असलेल्या वाकड येथील आसराई देवी मंदिर, तिसऱ्या दिवशी दि. २७ जुलै रोजी पश्चिमद्वार असलेल्या रावेत येथील ओझराई देवी मंदिर आणि चौथ्या दिवशी दि. २८ जुलै रोजी उत्तरद्वार असलेल्या आकुर्डी येथील मुक्ताई देवी मंदिरात यात्रा दर्शनासाठी जाणार आहे.
अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी दिली.