पालिकेबरोबरच स्वच्छ पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांचाही पुढाकार
पिंपरी, दि . १९ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेषतः भाजी मंडई, सार्वजनिक स्वच्छतागृहे व त्याच्या आसपासच्या परिसरांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ३२ राजीव गांधी भाजी मंडई, जुनी सांगवी येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे राबविण्यात आली.
या मोहिमेत पिंपरी चिंचवड महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक दीपक कोटीयान,आरोग्य निरीक्षक संदीप राठोड, आरोग्य मुकादम वैशाली रणपिसे व नारायण शितोळे यांच्यासह अन्य महापालिका कर्मचारी आदी सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांना डेंग्यू व मलेरिया या रोगांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, प्रतिबंधक उपाययोजना, घराच्या व परिसराच्या स्वच्छतेसाठीच्या सवयी, कचरा विलगीकरणाचे महत्त्व, एकल प्लास्टिक टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कापडी पिशव्यांच्या वापराचा आग्रह धरून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
परिसरातील पालापाचोळा, गवत, प्लास्टिक, कागद, पुठ्ठा यांसारख्या कचऱ्याचे संकलन करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. मोहिमेमध्ये स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महापालिकेला सहकार्य केले.
- जनजागृतीसाठी लोककलेचा प्रभावी वापर :
स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पथनाट्य, भारुड व इतर लोककला सादर करण्यात आल्या. या सादरीकरणांद्वारे कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमांचे आयोजन
साप्ताहिक स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध ठिकाणी विशेष स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. त्या ठिकाणीही जनजागृतीसह प्लास्टिक बंदी शपथ घेण्यात आली.
- आठ ही क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध ठिकाणी साप्ताहिक स्वच्छता:
अ क्षेत्रीय कार्यालय: आकुर्डी भाजी मंडई, अप्पूघर, दत्तनगर, पिंपरी भाजी मार्केट
ब क्षेत्रीय कार्यालय: मुक्ताई चौक, दगडोबा चौक, भारतमाता चौक
क क्षेत्रीय कार्यालय: भोसरी, इंद्रायणीनगर मिनी मार्केट, अजमेरा
ड क्षेत्रीय कार्यालय: भुजबळ पार्क, कावेरी मार्केट, लिनिअर गार्डन, सृष्टी चौक
इ क्षेत्रीय कार्यालय: मोशी, दत्त, गणेश, संत ज्ञानेश्वर भाजी मंडई
ग क्षेत्रीय कार्यालय: साई चौक पिंपरी, गुरुकृपा थेरगाव, डांगे चौक, नखाते चौक
फ क्षेत्रीय कार्यालय: अन्नपूर्णा, कृष्णानगर, घारजाई भाजी मंडई
ह क्षेत्रीय कार्यालय: कासारवाडी, दापोडी, साई चौक, गजानन भाजी मंडई











































