मानवी संवेदना जागृत ठेवून पत्रकारितेची गरज

0
8

डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे प्रतिपादन

दि . १९ ( पीसीबी ) – पिंपरी तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्र दिपून गेले आहे. दुसरीकडे मूल्य हरवत आहे सत्य वार्तांकनापासून पत्रकारिता हरवत चालली आहे. सायबर युगात मानवी संवेदना जागृत ठेवून पत्रकारिता करण्याची गरज आहे. त्यासाठी विवेक बुद्धी, स्व नियमन व स्वनियंत्रण गरजेचे असल्याचे प्रतिपादन जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी येथे केले.

ब्रह्मकुमारीज मीडिया प्रभागाच्या वतीने पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पुणे जिल्हास्तर मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सायबर युगातील पत्रकारिता मूल्य आव्हाने आणि संधी या विषयावर डॉ. वडनेरे बोलत होते . यावेळी माउंट आबूचे राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग ब्रह्मकुमार डॉ. शांतनू भाई, पिंपरी सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी सुरेखा दीदी, मीडिया विभागाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ म्हस्के, मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, नाना कांबळे, शितल दीदी आदी उपस्थित होते.

डॉ. शांतनू भाई यांनी नकारात्मकता, यलो जर्नालिझम शहानिशा न करता बातम्या देणे या गोष्टी थांबल्या पाहिजेत. विश्व एकता शांतीसाठी मीडियाचे योगदान गरजेचे आहे. माहिती आणि शिक्षणाचे कार्य मीडियाने करावे असे आवाहन केले.

नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी लेखणी हाती घेतली त्यावेळी राष्ट्रप्रेम त्याग, ध्येयाने पत्रकारिता प्रेरित होती स्वतंत्र्योत्तर काळात पत्रकारिता ही व्यवसाय म्हणून केली जाऊ लागली वाचकांना आदर्श लोकशाहीचे धडे देणे, देशवासी यांचे जीवन सुकर करण्यासाठी आवाज उठवणे या ध्येयाने पेटून उठून काही पत्रकारांनी चांगली कामगिरी केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणीतील अत्याचारा विरोधात जनजागृती, बोफोर्स प्रकरण,तहलका प्रकरण शिवानी भटनागर प्रकरण टू जी स्पेक्ट्रम घोटाळा,आदर्श घोटाळा, पुण्यातील अपघात प्रकरण,बदलापूर अत्याचार प्रकरण अशा अनेक प्रकरणात वृत्तपत्रांनी चांगला आवाज उठवला आहे. मात्र व्यावसायिकतेचा अतिरेक झाल्याने काही प्रमाणात निपक्षपातीपणा लोप चालला आहे. लोकमान्य टिळक,बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता, रामशास्त्री प्रभुणे यांचा करारी बाणा या गोष्टी पत्रकारांना महत्त्वाच्या वाटू लागतील तेव्हा पत्रकारितेला चांगले दिवस येतील.

एफ टी आय चे संजय चांदेकर यांनी सध्याच्या सायबर युगात तंत्रज्ञानावर स्वार होणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. ब्रह्मकुमार अनुप यांनी आभार मानले.