देशभरात २०० ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

0
8
  • ३०० कोटींचा कर चुकवल्याचा संशय

आयकर विभागाने देशभरातील २०० ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली आहे. आयकर रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी सुरु होती. या पद्धतीने करचोरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात आयकर विभागाने चौकशी सुरु आहे. त्या चौकशी अंतर्गत देशभरातील २०० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील एका फर्मची १६ तास चौकशी करण्यात आली.

राजकीय पक्ष आणि इतर संस्थांच्या नावाने खोट्या देणग्या दाखवून करचोरी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे देशभरातील काही चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा समावेश आहे. देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ८०जी अन्वये ३०० कोटींचा कर चुकवल्याचा संशय आयकर विभागाला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये विभागाने चौकशी सुरु केली होती. त्यात कर चुकवण्याचे प्रकार समोर आले. राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीच्या संशय आहे. आयकर विभागाने विविध संस्थांचे कार्यालय आणि घरांवर छापे टाकले. फसव्या फाइलिंगमध्ये फायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही लोकांनी जास्त परतावा मिळविण्यासाठी चुकीचे टीडीएस रिटर्न देखील सादर केले होते.

सीबीडीटी बोर्डने म्हटले की, कलम १०(१३अ) (घरभाडे भत्त्याखाली सूट), ८०जीजीसी (राजकीय पक्षांना दिलेली देणगी), ८०ई (शैक्षणिक कर्जावरील व्याजासाठी वजावट), ८०डी (वैद्यकीय विम्याशी संबंधित वजावट), ८०ईई (गृहकर्जावरील व्याजासाठी वजावट), ८०ईईबी (इलेक्ट्रिक वाहनांसाठी वजावट), ८०जी आणि ८०जीजीए (धर्मादाय किंवा संशोधन संस्थांना दिलेली देणगी), आणि ८० डीडीबी (कर्करोग इत्यादी गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वजावट) अंतर्गत उपलब्ध असलेल्या वजावटीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. दरम्यान, आयकर विभागाने करदात्यांना आपली सत्य माहिती देण्याचे आवाहन केले आहे.