काटेंचा काटा आम्ही काढणार

0
7

महाराष्ट्र , १४ जुलै ( पीसीबी ) : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काळी शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षानेदेखील निषेध केला आहे. संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेचा ‘काटा’ काढणार आहे. मुद्द्याची लढाई मुद्द्याने आणि गुद्द्याची लढाई गुद्द्याने लढणे हा संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे.

मनोज आखरे म्हणाले की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराला मानणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. गेल्या 28 वर्षापासून महाराष्ट्रात वैचारिक चळवळीत प्रचंड मोठे परिवर्तन केले आहे. नुकतेच अर्बन नक्षलवादी बिल पास केले आहे. त्यानंतर पहिली कार्यवाही संभाजी ब्रिगेडवर करायचे षडयंत्र या सरकारने केलं आहे. त्यामुळे या हल्ल्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघितले पाहिजे. षडयंत्र रचून हा हल्ला केला आहे. हल्लेखोरावर तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे. संभाजी ब्रिगेडला न्याय मिळवून दिला पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मनोज आखरे पुढे म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, भाजपचा या हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. मग असे कार्यकर्ते भाजपच्या पदावर कसे काय ठेवले? गुंड प्रवृत्तीचे लोक पोसण्यासाठी अशी पार्टी विथ डिफरेंस काढली का? भाजप अशी झुंडशाही सांभाळणार आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील यांच्यावर ज्यावेळेस शाई फेक झाली होती, त्यावेळेस गंभीर गुन्हे दाखल केले होते. गायकवाड यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. शासनाला विनंती आहे की, त्या दोषींवर तत्काळ कारवाही करा नाहीतर संभाजी ब्रिगेड सक्षम आहे. त्या काटेंचा काटा आम्ही काढणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातच नाही तर सर्व देशांमध्ये आदर आहे. जिथे-जिथे मानव वस्ती आहे, तिथे-तिथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आदर आहे.

संभाजी ब्रिगेडचं नाव संभाजी ब्रिगेडच राहणार
संभाजीमधील जी ही आदरयुक्त शब्द आहे. त्यामुळे असे तकलादू विधान करून काहीतरी मुद्दा काढून संभाजी ब्रिगेडला बदनाम करणे चुकीचं आहे. संभाजी ब्रिगेडचं नाव संभाजी ब्रिगेडच राहणार आहे. आम्ही काना मात्रामध्ये सुद्धा बदल करणार नाही. यात किंचितही बदल होणार नाही. आम्ही सरकारला सुद्धा आव्हान करतोय की, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तत्काळ भूमिका घ्या अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. संभाजी ब्रिगेड मुद्द्याची लढाई मुद्द्याने आणि गुद्द्याची लढाई गुद्द्याने लढणे हा संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.