महापालिका निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये

0
6

पुणे, दि . १४ ( पीसीबी ) – मागील काही वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांचे या निवडणुका कार्यक्रमांकडे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य करताना संभाव्य कार्यक्रमच सांगितला आहे. अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना सगळ्याच प्रभागात निवडणुकीची तयारी करण्याची सूचना दिली असल्याचे वृत्त एका वृत्तसंकेत स्थळाने दिले आहे. त्यामुळे महायुतीत बिनसल्यास राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

या बैठकीत अजित पवार यांनी स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होतील. त्यानंतर महापालिका निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबर अखेरीस लागण्याची शक्यता आहे, असे सांगून दिवाळीनंतरच महापालिका निवडणूक होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी अजित पवार यांनी रविवारी बैठकीत पदाधिकाऱ्यांनी दिले.

अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महापालिका निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या कालावधीत संघटनात्मक बळकटीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करा. प्रत्येक प्रभाग, विभाग व मतदारसंघात कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधा, असे आदेश त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत अजित पवारांनी संकेत दिले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या, दिवाळीच्या नंतर जाहीर होतील, असा स्पष्ट संकेत त्यांनी दिला.
अजित पवारांनी प्रभागनिहाय नियोजनावर भर देण्यास सांगितले. स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीनेच कामाला लागा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र ताकदीने उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.