पुणे, १३ जुलै ( पीसीबी ) : राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि विकासकामांचा आज सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे मेट्रो मार्गिका – ३ वरील विविध स्थानकांसह हिंजवडी आणि आजूबाजूच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करून सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती तपासण्यात आली.
या दौऱ्यात मेट्रो मार्गिका – ३ वरील स्थानक क्र. ०६ (क्रोमा), स्थानक क्र. ०३, स्थानक क्र. ०२, हेलिपॅड सर्कल, माण रोड, माण गाव, लक्ष्मी चौक आणि संपूर्ण हिंजवडी परिसरातील विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसामुळे साचणारे पाणी, खराब रस्त्यांची अवस्था, प्रचंड वाहतूक कोंडी यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.
स्थानिक अधिकाऱ्यांना या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विशेषतः पावसाळ्यातील जलनिकासी व्यवस्थेचे त्वरित सुधारणा, रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.
या पाहणीत संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि मेट्रो प्रकल्पाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. हिंजवडी परिसराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.