आयुक्त शेखर सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण; पिंपरी-चिंचवड शहरातील विकास प्रकल्पांमध्ये अपयशाची मालिका?

0
8
  • आयुक्तांच्या हकालपट्टीची भाजपकडून मागणी

पिंपरी, दि . १२ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा प्रशासकीय कार्यकाळ संपला असताना त्यांच्या कार्यकाळातील विविध अपयशांवर आता टीका सुरु झाली आहे. शहरातील २४ तास पाणी पुरवठा योजना, रस्त्यांची दुर्दशा, अतिक्रमण, धोकादायक इमारती, तसेच बेकायदेशीर बांधकाम प्रकरणांमध्ये निष्क्रियता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली आहे.

पाणीपुरवठा योजना अर्धवट
शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेचा गाजावाजा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना आजही अनियमित व कमी दाबाचा पाणीपुरवठा भोगावा लागत आहे. आयुक्तांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अपयश पत्करले, असे आरोप करण्यात आले आहेत.

मेट्रो कामामुळे महामार्गाची चाळण
निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मोठे खड्डे, धोकादायक वाहतूक व त्यामुळे वाढलेली अपघातांची संख्या यामुळे नागरिक संतप्त आहेत. या संदर्भात BRT विभागाचे अधिकारी बापू गायकवाड यांनी खुलासा केला असून, मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीसाठी लेखी सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

धोकादायक इमारती, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी नाही
निगडी सेक्टर २२ मधील ‘जवाहरलाल नेहरू पुनर्वसन प्रकल्प’ न्यायालयीन स्थगितीच्या विळख्यात सापडलेला असून, महानगरपालिका या आदेशाविरोधात यशस्वी प्रयत्न करण्यात अपयशी ठरली आहे.
याच परिसरातील PCMC कॉलनीमधील ९ धोकादायक इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. तुटलेली जीने, गळका स्लॅब आणि मोडकळीस आलेल्या खिडक्या-दारे यामुळे जीवितहानीचा धोका कायम आहे.

अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे आणि राजकीय हस्तक्षेप
शहरात रेड झोन क्षेत्रातील भूखंड मोजणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही नगर भूमापन अधिकारी अद्याप मोजणी करण्यात अपयशी ठरले आहेत.
DP आरक्षणे रद्द करणे, राजकीय दबावाखाली निर्णय बदलणे, बेकायदेशीर बांधकामांवर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडक कारवाई केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. मोशी आणि कुदळवाडी येथील बांधकाम परवाना विभागातील अधिकारी व मार्शल यांच्यावरही लाच घेण्याचे आरोप झाले असून, या प्रकरणात आयुक्तांनी उशिरा कारवाई केल्याचे म्हणणे आहे.

शहरातील स्वच्छता व्यवस्था ढासळली
शहरातील स्वच्छता आणि नाल्यांची सफाई यामध्ये ठेकेदारांकडून हलगर्जीपणा दिसून येत असून, कोट्यवधी रुपये खर्च करूनही घाणीचे साम्राज्य वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे संकट गडद होत आहे. नदी सुधार प्रकल्पही अर्धवट स्थितीतच सोडण्यात आला आहे.

ठेकेदारी शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा
महानगरपालिका शाळा आणि रुग्णालये खाजगी तत्वावर चालवण्यासाठी ठेकेदारांशी व्यवहार करून खर्च केला जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि ठेकेदार पोसणे हा उद्देश असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

“आयुक्त हकालपट्टीस पात्र” — भाजप चिटणीस सचिन काळभोर यांची मागणी
“शेखर सिंह यांचा कार्यकाळ अपयशाचा ठसठशीत नमुना ठरला आहे. त्यांनी कोणत्याही विषयावर ठोस आणि वेगवान निर्णय न घेतल्यामुळे शहराचा विकास खोळंबला आहे. नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे अशा आयुक्तांची तातडीने हकालपट्टी व्हावी,”
— सचिन काळभोर, चिटणीस, भाजपा, पिंपरी-चिंचवड शहर