जयंत पाटील यांच्या जागेवर शशिकांत शिंदे

0
6

दि . १२ ( पीसीबी ) – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी जयंत पाटील यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याबाबत भाष्य केलं होतं. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पवारांनी देखील जयंत पाटलांच्या भूमिकेला मूकसंमती दिली होती. आता अखेर पाटलांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरु असतानाच शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, शिंदे यांनी अद्याप नाव निश्चित नसल्याचे म्हटले आहे. शशिकांत शिंदे शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जातात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ते शरद पवारांसोबत कायम राहिले.

शशिकांत शिंदे हे कोरेगावचे दोन टर्मचे विधानसभेचे आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी मंत्री म्हणून देखील कामकाज पाहिलं आहे. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे साहजिकच त्यांच्या संपत्तीबाबत चर्चा होऊ लागली आहे. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे एकूण ५४ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे.

एकूण संपत्ती किती?

यात तीन कोटी नऊ लाख रुपयांची जंगम, तर दोन कोटी ६५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दहा कोटींची शेतजमीन असून, एक कोटी १४ लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत. २०१९ मध्ये त्यांच्याकडे एकूण ४४ कोटी २६ लाखांची संपत्ती होती. यामध्ये तब्बल दहा कोटी १२ लाखांनी वाढ होऊन ती ५४ कोटी ३८ लाखांवर गेली.

शशिकांत शिंदे यांनी २०२२- २३ मध्ये ५७ लाख ६७ हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले होते. पत्नी वैशाली यांनी एक कोटी ४६ हजार कर प्राप्त उत्पन्न, तर हिंदू अविभक्त कुटुंब तीन लाख सात हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखविले आहे.

तर विविध बॅंकांमध्ये शशिकांत शिंदेंची २२ लाख १७ हजारांची ठेवी व शिल्लक रक्कम आहे. तर पत्नी वैशालींच्या नावे २९ लाख ९३ हजार १३१ रुपयांच्या ठेवी व शिल्लक रक्कम आहे. विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये शशिकांत शिंदेंच्या नावे ८४ लाख ९८ हजारांची गुंतवणूक तर पत्नी वैशालींच्या नावे सात कोटी ४८ लाखांची गुंतवणूक आहे.
शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याकडे एक कोटी १४ लाखांच्या चार आलिशान गाड्या आहेत. यामध्ये फॉर्ड इंडिवेअर, टोयाटो फॉर्च्युनर, टोयाटो इनोव्हा, बीएमडब्ल्यू या गाड्यांचा समावेश आहे. शशिकांत शिंदे यांच्या पत्नीकडे ८६५ ग्रॅम सोने असून, त्याची किंमत ४० लाख ४३ हजार रुपये आहे. शशिकांत शिंदेंकडे दहा कोटींची शेतजमीन असून, पत्नीच्या नावे २६ कोटी ८५ लाखांची जमीन आहे.