दि . ११ ( पीसीबी ) – पुण्यात एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला धरणाजवळील जंगल परिसरात तरुण आणि तरुणीचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेली तरुणी अल्पवयीन असून तिचे वय केवळ १६ वर्ष इतके आहे. मृत मुलगा सज्ञान असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी आत्महत्या का केली यामागरेच कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या ठिकाणी त्यांनी विष प्राशन केले, तिथे त्यांच्या मृतदेहाशेजारीच विषाची बाटली आढळून आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी अधित तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या १६ वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडलं होते. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान एका संशयित मुलाचा देखील तपास याप्रकरणात करायला सुरुवात केली. तो मुलगा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याचा मोबाईल फोन बंद होता.
दरम्यान, आज खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात २ मृतदेह मिळून आल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी धाव घेत यासंदर्भातची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. या दोघांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.