कार्यक्रमस्थळाची क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांचेकडून पाहणी…..
पिंपरी, दि . ११ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येते. यंदाही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
पाहणी दरम्यान मेट्रो व्यवस्थापनेचे व्यवस्थापक धनंजय कृष्णन, येतेंद्र कुलकर्णी, युवराज गावंडे, महापालिका स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय वाईकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,माजी अध्यक्ष नितीन घोलप, संजय ससाणे,नाना कसबे,अरूण जोगदंड,सुनिल भिसे, दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब खंदारे, महापालिका उप अभियंता अभय कुलकर्णी, जयकुमार गुजर,शामसुंदर बनसोडे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजीत गनबोटे, भाऊसाहेब गवंडी, तसेच महापालिका संबधित अधिकारी व मेट्रो प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यक्रम स्थळाचा सविस्तर आढावा घेतला तसेच कार्यक्रमपूर्व आणि कार्यक्रमादरम्यान आवश्यक असलेल्या स्थापत्य, स्वच्छता, विद्युत सुविधा, मंच रचना, वाहनतळ व्यवस्था, महिला व वयोवृद्ध नागरिकांसाठी सुलभ मार्ग आदी बाबींविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचनाही दिल्या.
या पाहणी दरम्यान कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेज,मंडप, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, व्यासपीठाचे डिझाईन,चित्रफिती किंवा पोस्टर्स, कार्यक्रमस्थळी परिसराची स्वच्छता व डासमुक्ती याकडे विशेष लक्ष, कार्यक्रमापूर्वी आणि दररोज कार्यक्रमानंतर परिसराची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, अग्निशमन, पाणीपुरवठा आणि आपत्कालीन सुविधा यांची तयारी ठेवण्यात यावी अशा सूचना क्षेत्रीय अधिकारी पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरवर्षी निगडी येथे होणा-या विचार प्रबोधन कार्यक्रमात प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित परिसंवाद, विचारवंत वक्त्यांचे व्याख्यान,निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चित्रप्रदर्शन यांसारखे उपक्रमही राबविण्यात येतात, प्रबोधन पर्वात विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचाही सहभाग असतो.
आढावा बैठकीचे आयोजन…..
या पार्श्वभूमीवर सोमवार दि.१४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारी, पोलीस व मेट्रो प्रशासन, पी.एम.पी.एम.एल. अधिकारी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना प्रतिनिधीं यांचेसमवेत आढावा बैठक आयोजीत करण्यात आलेली असून शहरातील सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी सदर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याजवळ पैशाची बॅग, व्हिडीओ व्हायरल
राज्याच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी, त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचा दावा केला होता. दरम्यान, पैशांची बॅग शेजारी घेऊन बसले असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यासंदर्भात केलेला दावा खरा ठरल्याची चर्चादेखील रंगली आहे.
राऊत यांनी या व्हिडीओसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केले होते. पैशांच्या बॅगेसह शिरसाट असल्याचा दावा राऊतांनी केला होता. दरम्यान, शिरसाटांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर शिरसाट यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले शिरसाट?
जो व्हिडीओ पाहत आहात तो माझ्या घरातील आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय.
संजय राऊतांनी आज ठरल्याप्रमाणे भुंकण्याचा काम केले. शिंदे साहेब दिल्लीला अमित शाह साहेबाला भेटले व त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा. परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं पाहिलं, तर यांना संताजी-धनाजी दिसतात का? असा प्रश्न आहे. मुर्खासारखे स्टेटमेंट दिसतात. सकाळी उठले का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे ..एवढचं संजय राऊत यांचं चालू आहे. गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा शब्दात राऊतांचाही शिरसाटांनी समाचार घेतला.