हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा

0
36

हिंजवडी वाहतूक समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक: आमदार शंकर जगताप यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून तातडीचे आदेश

मुंबई, दि. १० : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे हजारो आयटी कर्मचारी आणि रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. या गंभीर समस्यांकडे विधानसभेत लक्ष वेधत आमदार शंकर जगताप यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१० जुलै) मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाहतूक, मेट्रो, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत अनेक निर्णायक निर्णय घेण्यात आले.

३० मीटर पर्यायी रस्त्यासाठी आमदार जगताप यांचा आग्रह

आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत सविस्तर भूमिका मांडत सूर्य हॉस्पिटलपासून वाकडमार्गे हिंजवडी फेज ३ पर्यंत PMRDA हद्दीतून ३० मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता आरक्षित करून विकसित करण्याची मागणी केली.
“या रस्त्यामुळे सध्याच्या मुख्य मार्गावरील ५० टक्क्यांहून अधिक वाहतूक डायव्हर्ट करता येईल आणि कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, PMRDA आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांना रस्ता आरक्षित करून लवकरात लवकर विकसित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

नवीन मेट्रो मार्ग व रस्ते योजनांसाठी पुढाकार

बैठकीत निगडी मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–चाकण या मार्गासाठी नवीन मेट्रोचा DPR मंजूर करण्याची मागणीही आमदार शंकर जगताप यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, हा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पुढे पाठवण्याचे आदेश दिले.

सिंगल पॉईंट ॲथॉरिटीची घोषणा

हिंजवडीमधील अनेक शासकीय विभागांच्या समन्वयाअभावी होणारा विकास रखडत असल्याने आमदार शंकर जगताप यांनी एकवटलेल्या नियंत्रण यंत्रणेची गरज अधोरेखित केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ स्थापन करून सर्व विकासकामे एकाच छताखाली आणण्याची घोषणा केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा

या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, PMRDA आयुक्त योगेश म्हसे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच पुणे महापालिका आयुक्त नवकिशोर राम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
PMRDAने प्रस्तावित रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास, मेट्रो आणि भूसंपादन यावर सादरीकरण केले.

मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील महत्त्वाचे निर्देश दिले:

  • सिंगल पॉईंट ॲथॉरिटीद्वारे सर्व समन्वय
  • ३० मीटर पर्यायी रस्ता विकसित करणे
  • डिसेंबर २०२५ पर्यंत हिंजवडी मेट्रो मार्ग सुरू करणे
  • लक्ष्मी चौक पूल सहापदरी करणे
  • पार्किंग व वाहतूक नियंत्रणासाठी तांत्रिक उपाय
  • पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक अंडरपासचे काम सुरू करणे

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार ठरतोय निर्णायक

हिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबसाठी भक्कम रस्ते, सार्वजनिक वाहतूक व नियोजन महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी थेट मुख्यमंत्री स्तरावर प्रश्न उपस्थित करत प्रशासन हलवले.
त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतरच ही बैठक आयोजित झाली आणि निर्णयाच्या दिशेने वाटचाल झाली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या सह आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे, बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UnclogHinjawadiITPark मोहिमेतील प्रतिनिधी, हिंजवडी एम्प्लॉईज अ‍ॅण्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्यासह IT फोरम व सोसायटी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.