‘जातिधर्म विसरून एकोपा जपा!’ ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे

0
8

पिंपरी, दि. ७ ‘जाती अन् धर्म माणसाने निर्मिले आहेत. या चौकटी भेदून माणुसकीची जपणूक सर्वांनी करावी!’ असे विचार ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी न्यू इंग्लिश स्कूल माण, मुळशी येथे व्यक्त केले.
वै. मुरलीधर कंक मास्तर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिलासा संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण, मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
आषाढी एकादशीचे निमित्त साधून राधाबाई वाघमारे यांनी संत कान्होपात्रा यांचा ‘येते पंढरीला तुझ्या मी विठ्ठला l सुख दुःख सारे विसरायला ||ʼ हा अभंग सादर केला. प्रसिद्ध लेखक नारायण कुंभार, वेदान्तश्री प्रकाशनचे सुनील उंब्रजकर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अंबादास रोडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, कवी अरुण परदेशी, मुरलीधर दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल, माण येथील शालेय विद्यार्थ्याच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
पांडुरंगाची आरती म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कवी शामराव सरकाळे यांनी ‘चंद्रभागेला भेटण्या चालली इंद्रायणी’ हे स्वरचित भक्तिगीत सादर केले. सन २०२५ या वर्षात शालान्त परीक्षेत यश मिळविलेले मिसबा शफिक खान ( प्रथम क्रमांक), सुमेध संदीप राणे ( द्वितीय क्रमांक), हर्षल सतीश वाघमारे ( तृतीय क्रमांक), ऋतुजा खंडू भांड ( चतुर्थ क्रमांक), गणेश गोपाळ बिरादार ( पाचवा क्रमांक ) यांना प्रशस्तिपत्र, रोख शैक्षणिक मदत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
राधाबाई वाघमारे यांनी समता आणि एकता याचे महत्त्व विषद करताना कवितेतून,
‘हिंदू म्हणतात रामराम
मुस्लीम कहते है सलाम
दोनोंका शब्द अलग हैं
मगर दोनोंका भगवान एक हैं…’ असे प्रमाण दिले. लेखक नारायण कुंभार म्हणाले… ‘विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, ध्येयवाद जपावा.’
प्रकाशक सुनील उब्रजकर यांनी इयत्ता ९ वी तून १० वीत गेलेल्या विद्यार्थ्यांशी थेट मनमोकळा संवाद साधला. मोबाईल किती वेळ पाहता? अभ्यास किती वेळ करता? कोणते विषय अवघड वाटतात? असे अनेक प्रश्न विचारून शिक्षक अन् विद्यार्थी यांना बोलते केले. अंबादास रोडे म्हणाले… ‘शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने जपली आहे. ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.’ विजय भांगरे, भीमराव वाढवे, साधना शिंदे, मनीषा मोरे, ज्योती गायकवाड, शीतल टकले, बाळासाहेब जाधव, सुदाम केळकर, बाळासाहेब माने यांनी संयोजन केले. गोकुळ गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संभाजी थिटे यांनी सूत्रसंचालन केले; तर आभार मंगल गायकवाड यांनी मानले.