मुंबई, दि. ५ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू आता एक झाले आहेत. ठाकरे बंधूंचा आज मुंबईतील वरळी डोम सभागृहात एकत्र मेळावा पार पडला. या मेळाव्यात व्यासपीठावर फक्त ठाकरे बंधू होते. दोन्ही ठाकरे बंधूंचं आज भाषण झालं. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर तोबा गर्दी केलेली होती. गर्दी इतकी वाढली होती की, कार्यकर्त्यांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही दोन बंधू एकत्र आलो, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “आमच्यातील आंतरपाठ अण्णाजी पंत यांच्यामुळे दूर झाला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही ठाकरे बांधवांच्या मेळाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
“पहिल्यांदा तर मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की, त्यांनी दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. पण मला असं सांगण्यात आलं होतं की, विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी हृदालीचं भाषण देखील झालं. मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आमच्या हाती सरकार द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता. ही हृदाली होती. त्या हृदालीचं दर्शन आपण घेतलेलं आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.