रावेत, दि . ५ ( पीसीबी ) – रावेत परिसरात सार्वजनिक उद्यानाची नितांत गरज असल्याने आय टू आर मधून उपलब्ध जागेत आधुनिक पध्दतीचे देखणे उद्यान निर्माण करण्याची मागणी भाजपचे दीपक भोंडवे यांनी केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या सहकार्याने चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या आमदार फंडातून हे काम व्हावे, अशीही शिफारसही त्यांनी पत्रात केली आहे.
महापालिका प्रशासनाला या संदर्भात एक पत्र दीपक भोंडवे यांनी दिले.
रावेत परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत नागरिकांसाठी सोयिसुविधा नाहीत. उद्याने, खेळाची मैदाने, जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक केंद्र, मंडई, दवाखाना, शाळा आदी आरक्षणे विकसीत झालेली नाहीत. गेल्या पाच वर्षांत सुमारे पाऊन लाख मतदार म्हणजे दीड लाख लोकसंख्या वाढली आहे. या नागरिकांसाठी सुसज्ज उद्यानाची गरज आहे. नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर पांडुरंग जगताप यांना त्याबाबत विनंती केली असता “आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत” आमदार निधीतून हे काम तत्काळ सुरू करण्याचे त्यांनी मान्य केले.
रावेत सर्वे नं. 74/5 चंद्रभागा कॉर्नर येथे सार्वजनिक उद्यानाचा प्रस्ताव आहे. नियोजित उद्यानाचे जागेची पाहणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य (उद्यान) विभागाच्या अधिकारी सौ. उषा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी करण्यात आली. पुढील काही दिवसांतच प्रत्यक्ष कामांची सुरुवात होईल तसेच येथील रहिवाशांना येत्या काळात एक हक्काचे उद्यान उपलब्ध होईल असे भोंडवे यांनी सांगितले.