महापालिकेची डीएमएस प्रणाली बंद, प्रशासकीय कामकाज ठप्प आयुक्त शेखर सिंह यांचा आग्रह नडला, तब्बल 112 काेटींचा खर्च पाण्यात,

0
13

पिंपरी, दि. ३ ( पीसीबी )- पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ एप्रिल 2025 पासून सुरू केलेली दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली ( डीएमएस) यंत्रणा मंगळवार (दि.१) पासून बंद पडली आहे. त्यामुळे महापालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. गुरूवारीही प्रणाली सुरू हाेण्यास विलंब लागणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे ११२ काेटी रूपये खर्च करून अवघ्या तीन महिन्यात डीएमएस प्रणाली गंडल्याने अधिका-यांमधून राेष व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रणालीमध्ये सातत्याने अडचणी येत असल्याने कामकाज जलद हाेण्याऐवजी विलंब लागत असल्याने अधिका-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डीएमएस म्हणजे अडथळ्यांची शर्यत असल्याची भावना अधिका-यांमध्ये हाेऊ लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून कागदविरहित प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली. कामकाजात दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली ( डीएमएस) आणि कार्यप्रवाह प्रणाली (डब्ल्यूएफ) वापरण्यास सुरूवात केली. यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस एनेबल ईआरपी प्रकल्पाअंतर्गत ३३ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांचे वेतन व ठेकेदारांची देयके काढण्यासाठी ‘सॅप’ प्रणालीचा वापर केला जात आहे. विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा प्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले आहेत. एक हजार ७०९ डिजिटल स्वाक्षरी ‘की’ तयार करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रणालीवर ११२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

महापालिकेच्या सर्व प्रकारच्या नस्ती तयार करण्यासाठी दस्तऐवज व्यवस्थापन आणि कार्यप्रवाह प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायिकरण व शोध घेतला जात आहे. तर, कार्यप्रवाह प्रणालीमुळे प्रत्येक नस्तीचे कामकाज वेळेत पूर्ण होत असून वेळेची बचत होत असल्याचा दावा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा आहे. प्रशासनाचे कामकाज पूर्णतः डिजिटल झाल्यामुळे निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता वाढीस मदत हाेणार असल्याचे प्रशासनाचे मत हाेते. मात्र, या डीएमएस प्रणालीत वारंवार व्यत्यय येत आहे. एक फाईल सबमिट करण्यासाठी दहा मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जाताे. इंटरनेट आणि वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते. इंटरनेटला पाहिजे तेवढी गती नसल्याने कामकाज वेळेत पूर्ण हाेण्याऐवजी अधिकचा विलंब हाेत आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या तीव्र आग्रहाखातर डीएमएस प्रणाली महापालिकेच्या सर्व विभागात माेठा गाजावाजा करित सुरू केली. यासाठी तब्बल ११२ काेटींच्या खर्च करण्यात आला. मात्र, प्रणाली सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासूनच विविध अडथळे येत आहे. अधिक क्षमतेची फाईल अपलाेड हाेत नव्हती. त्यामुळे सुमारे एक महिना स्थायी आणि सर्व साधारण सभा विषयांअभावी झाली नाही. आता तीन महिन्यात पुन्हा प्रणाली दाेन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रणालीवर खर्च केलेले 112 काेटी पाण्यात जातात की काय अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे.

निगडीतील डाटा सेंटरमध्ये विद्युत विषयक आणि तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून डीएमएस प्रणाली बंद आहे. प्रणाली सुरू करण्यासाठी तांत्रिक उपाय याेजना केल्या जात आहे. आज गुरूवारी (दि.३) प्रणाली सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी. सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.