Infosys च्या ‘वॉशरूममध्ये’ लपून रेकॉर्ड करायचा महिलांचे व्हिडीओ; फोनमध्ये ३० पेक्षा जास्त महिलांचे व्हिडीओ

0
9

बंगळुरूदि. ३ ( पीसीबी ) : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या बंगळुरू कॅम्पसमधून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. कंपनीत काम करणाऱ्या एका पुरुष कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये कंपनीतील सुमारे ३० महिला सहकाऱ्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेचा तपशील
30 जून 2025 रोजी, इन्फोसिसच्या इलेक्ट्रॉनिक सिटी कॅम्पसमधील एका महिला कर्मचाऱ्याने वॉशरूममध्ये जाताना संशयास्पद सावली पाहिली. तिला आपला व्हिडीओ रेकॉर्ड होत असल्याचा संशय आला आणि तिने आरडाओरडा केला. या आवाजामुळे कॅम्पसमधील इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले. संशयिताची ओळख स्वप्नील नागेश माळी (वय २८) अशी झाली आहे, जो इन्फोसिसचाच कर्मचारी असून मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. घटनेनंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

मोबाईलमधून आढळले ३० हून अधिक व्हिडीओ
कंपनीच्या एचआर विभागाने आरोपीचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये ३० पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे कंपनीतील कर्मचारी वर्गात अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

तक्रार आणि पोलिसांची कारवाई
पीडित महिलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर, त्याच्या सल्ल्याने तिने तात्काळ 1 जुलै रोजी बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्वप्नील माळीला अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (IT Act) संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

एचआर विभागावरही प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर कंपनीच्या अंतर्गत यंत्रणा, विशेषतः एचआर विभागाच्या सुरक्षात्मक भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एखाद्या नामांकित कंपनीच्या कार्यालयीन परिसरात असे गंभीर प्रकार घडणे, आणि त्यामध्ये अनेक महिला कर्मचाऱ्यांचा गोपनीयतेचा भंग होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.