पिंपरी, दि. ३ ( पीसीबी ) पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. त्यात भाजप आमदार मुंबई महानगरपालिकेचा विषय हमखास काढतातच. त्याचप्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या भोंगळ कारभाराविषयी चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते माधव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.
त्यात पाटील म्हणतात कि
गेले ८ वर्षे या शहराकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नाही. पालिकेचे दरवर्षीचे बजेट ७००० कोटी, म्हणजे आठ वर्षात ५६००० कोटींचे काय केले याचा हिशोब कॉमन मॅनला कोणी देत नाही.
कुत्र्यांच्या नसबंदीत घोटाळा, पवना बंद जलवाहिनी खर्चाची ३०० वरून १५०० कोटींची उड्डाणे, भोसरीतील सव्वा किलोमीटरचा रस्ता अद्ययावत करण्यासाठी ८१ कोटी , पावसाळ्यात स्मार्ट सिटीचा उडालेला बोजवारा, ट्राफिक जॅम याकडे लक्ष वेधले. हे सर्व कंत्राटदारांसाठी सुरु आहे असे ते म्हणाले. वर्षाचे पालिकेच्या बजेटचे ७००० कोटी कमी पडतात म्हणून फक्त २०० कोटी रुपयांचे बॉण्ड, “ भीक बॉण्ड “ सुद्धा पालिकेने नुकतेच काढले.
यामुळे पिंपरी चिंचवडचे ३० लाख नागरिक खुश नाहीत. नवीन शहर सुधारणा आराखड्यामुळे शहराच्या गल्लीबोळात नाराजी आहे. मुख्यमंत्री हे काही ठराविक लोकांच्या सांगण्यावरून ठराविक ठिकाणचे आरक्षण रद्द केल्याचे जाहीर करतात याबद्दल पाटील यांनी या पत्रातून राग व्यक्त केला. पूर्ण डीपीच रद्द करावा हे कॉमनमॅनला वाटते आणि त्यासाठीच माधव पाटील यांनी पत्राद्वारे याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.