शिक्षिकेनेच केला सलग वर्षभर विद्यार्थ्यावर अत्याचार, गुन्हा दाखल

0
19

मुंबई, दि. २ ( पीसीबी ) : मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) ही कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षिकेने तिच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. ती मुंबईत एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला शिकवत होती. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप बनवताना शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली आणि जानेवारी 2024 मध्ये तिने त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंधासाठी मागणी घातली, असे तक्रारीत म्हटले आहे.

सुरुवातीला मुलगा तयार नव्हता आणि त्याने तिला टाळायला सुरुवात केली. शिक्षिकेने तिच्या एका मैत्रिणीला विद्यार्थ्याला फोन करायला लावला. ती मैत्रीण शाळेतील नव्हती. त्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितले की, मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध आता सामान्य झाले आहेत. “ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात,” असंही मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

मैत्रिणीच्या फोननंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. “शिक्षिकेने त्याला तिच्या गाडीतून एकांतात नेले, त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्याला खूप anxiety येऊ लागली, त्यामुळे शिक्षिकेने त्याला anxiety कमी होण्याची औषधे देखील दिली. त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि विमानतळाजवळ नेऊन अनेकवेळा लैंगिक संबंध ठेवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका त्याला अनेकदा दारू पाजत असे. या घटनेनंतर काही महिन्यांनी, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना त्याच्या वागण्यात बदल जाणवला आणि त्यांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी विचार केला की काही महिन्यांत तो शाळा सोडणार आहे, त्यामुळे त्यांनी याबद्दल वाच्यता न करण्याचे ठरवले. त्यांना वाटले की शिक्षिका त्याला त्रास देणे थांबवेल.

यावर्षी मुलाने बोर्डाची परीक्षा पास केली आणि तो शाळेतून बाहेर पडला, पण तो नैराश्यात गेला, असे पोलिसांनी सांगितले. शिक्षिकेने पुन्हा एकदा त्याला भेटायला बोलावले. यावेळी मात्र पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या संयम संपला आणि त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली.

दरम्यान, याप्रकरणी लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO Act), 2012 च्या कलम 4 (लैंगिक अत्याचार), कलम 6 (गंभीर लैंगिक अत्याचार) आणि कलम 17 (गुन्ह्यासाठी मदत करणे) तसेच भारतीय न्याय संहिता आणि किशोर न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.