मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार व रविवारी कॅश काऊंटर राहणार सुरू

0
4

३० जून पर्येंतच्या सवलतींचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला निर्णय

पिंपरी दि . २७ ( पीसीबी ) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीचा जास्तीतजास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी शनिवार (२८ जून) व रविवारी (२९ जून) या दोन्ही दिवशी मालमत्ता कर भरण्यासाठी कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेच्या सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काऊंटर सुरू राहतील, अशी माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी ३० जून २०२५ पर्येंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांमार्फत मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची बिलं वेळेत वाटप करण्यात आली आहेत. तसेच, सवलतीबाबत माहिती पोहचवण्यासाठी कर संकलन विभागाकडून वारंवार एसएमएस, कॉलिंग, जनजागृती मोहिमा, होर्डिंग्स व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत जनजागृती करण्यात येत आहे.

प्रत्येक विभागीय कार्यालयातून सहायक मंडल अधिकारी आणि गट लिपिक मालमत्ताधारकांशी थेट संवाद साधून त्यांना कर भरण्याचे आवाहन करत आहेत. या प्रयत्नांमुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेरीस ४३८ कोटी रुपयांचा कर भरणा झाला आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस विविध सवलती जाहीर केल्या जातात. यंदाही या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक मालमत्ताधारक उत्स्फूर्तपणे पुढे आले आहेत. ऑनलाईन कर भरणा सुविधेअंतर्गत सेवा उपलब्ध असल्या तरीही अनेक नागरिक रोखीने कर भरणा करतात. यामुळे कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन शनिवार, रविवारही कॅश काऊंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या योगदानाने शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
…..
१८ विभागीय कार्यालयांमधून एकूण ४३८ कोटी ३८ लाखांचे कर संकलन

वाकड – ५४ कोटी ६ लाख

थेरगाव – ४१ कोटी २९ लाख

कस्पटे वस्ती – ३३ कोटी १७ लाख

चिखली – ३३ कोटी २ लाख

भोसरी – २९ कोटी ३१ लाख

चिंचवड – २८ कोटी २८ लाख

पिंपरी-वाघेरे – २७ कोटी ७३ लाख

सांगवी – २४ कोटी ७ लाख

मनपा भवन – २३ कोटी ५६ लाख

किवळे – २९ कोटी ३१ लाख

मोशी – २५ कोटी ९ लाख

आकुर्डी – २० कोटी ३९ लाख

फुगेवाडी-दापोडी – १५ कोटी ४७ लाख

निगडी प्राधिकरण – ११ कोटी १५ लाख

तळवडे – १० कोटी ३९ लाख

चऱ्होली – १३ कोटी २७ लाख

दिघी-बोपखेल – ९ कोटी ८६ लाख

पिंपरी नगर – ३ कोटी ४५
….

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना विविध सवलती देत आहे. त्यामुळे नागरिकही स्वतःहून पुढाकार घेऊन कर भरण्यास उत्सुक आहेत. हे स्वागतार्ह असून, नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. सध्या शहरात एकूण १८ विभागीय कार्यालयांद्वारे कर संकलन करण्यात येत असून, ऑनलाईन भरणा सुविधाही उपलब्ध आहे. तसेच कार्यालयात येऊन रोखीने कर भरणाऱ्या नागरिकांसाठी येत्या शनिवारी व रविवारी देखील कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……

पिंपरी चिंचवड महापालिका आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करदात्यांना विविध सवलती उपलब्ध करून देत आहे. यामुळे नागरिकही स्वतःहून पुढाकार घेत कर भरण्यात उत्सुक आहेत. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. सध्या १८ विभागीय कार्यालयांतून कर संकलन सुरू असून, ऑनलाईन तसेच रोखीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पहिल्या तिमाहीअखेरपर्यंत ४३८ कोटींचे संकलन झाले असून, यामध्ये वाकड विभागाने ५४ कोटी ६ लाख, थेरगावने ४१ कोटी २९ लाख, कस्पटे वस्तीने ३३ कोटी १७ लाखांचा सर्वाधिक वाटा उचलला आहे.

  • अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका