पिंपरी चिंचवड दि . १९ ( पीसीबी ) : तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एका वारकऱ्याचा देहू-आळंदी रोडवर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेनने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला चिरडले. गंभीर जखमी झालेल्या या वारकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (दि. १८ जून) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कुदळवाडी परिसरात घडली. मृत वारकऱ्याचे नाव नारायण गोरावे (वय ५६) असे असून, ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अहिरे गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण गोरावे हे देहू-आळंदी रस्त्यावरून पालखी सोहळ्यासाठी पायी चालत होते. त्याच वेळी एका भरधाव क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काही वेळ देहू-आळंदी रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान असून, उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदी परिसरात लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. त्यासाठी पोलिसांनी वाहतूक बंदोबस्त कडक ठेवला आहे आणि काही रस्त्यांवर वाहनांची ये-जा बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीतदेखील वारकऱ्याच्या मृत्यूने पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हळहळ व्यक्त केली जात आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










































