एलन मस्क यांच्या सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकला भारतात परवानगी

0
9

– भारतात 90 कोटींपेक्षा अधिक लोकांपर्यंत इंटरनेट
दि . ७ ( पीसीबी ) – जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांच्या मालकीची सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक भारतात आपली सेवा सुरू करण्यास सज्ज झाली आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) स्टारलिंकला ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS)परवाना दिला आहे. या निर्णयामुळे भारतात हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा मार्ग आता अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

मीडिया अहवालांनुसार, स्टारलिंकची सेवा भारतातील 90 कोटींपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे, विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागात जिथे पारंपरिक इंटरनेट सेवा पोहोचणं कठीण आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर डिजिटल समावेश वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

स्टारलिंकने 2022 मध्ये GMPCS परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अटी आणि डेटा स्थानिकीकरण यांसारख्या नियमांमुळे प्रक्रिया काही काळ रखडली होती. आता कंपनीने DoT च्या सर्व अटी आणि शर्ती मान्य केल्या असून, त्यामध्ये डेटा सुरक्षेशी संबंधित धोरणांचाही समावेश आहे.

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी परवाना मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये स्टारलिंक ही तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी भारती समूहाची वनवेब आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी परवाने मिळवले आहेत. दुसरीकडे, अमेझॉनचा कुइपर प्रकल्प अद्याप परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे.

– भारतातील सॅटेलाइट ब्रॉडबँड मार्केटचा मोठा आकडा

एकूण अंदाजानुसार,भारताचं सॅटेलाइट ब्रॉडबँड मार्केट 2030 पर्यंत 1.9 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. या बाजारपेठेत स्टारलिंकसारख्या कंपन्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरेल.