भागवत धर्म पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे यांना जाहीर

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि . ६ ( पीसीबी ) : जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय भागवत धर्म पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी दिली.

भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यातील पत्रकारांना संस्थानचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ २०१९ पासून भागवत धर्म प्रसारक पुरस्कार देण्यात येतो. देहू-आळंदी पालखी सोहळा आणि वारकरी संप्रदायातील वार्तांकनाची दखल घेत यंदाचा पुरस्कार लांडगे यांना जाहीर झाला आहे.

सुनील लांडगे हे वारकरी संप्रदायातील असून आषाढी वारी प्रसारासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय
असे काम केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोकाभिमुख होण्यासाठी सन २००१ पासून देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करून तुकोबारायांचा सोहळा दैनिक सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स च्या माध्यमातून लाखो वैष्णवांपर्यंत पोहोचवला आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अशा विविध सोहळ्यांचे वार्तांकन आणि त्याबद्दल विशेष लेख लिहून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केलं आहे.

Share This Article