दि . ४ ( पीसीबी ) – पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असतानाच, सोलापुरातून समोर आलेल्या आणखी एका हुंडा छळ प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी गावात २२ वर्षीय आशाराणी भोसले हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून जीवन संपवलं आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१९ साली पवन भोसले याच्याशी आशाराणीचा विवाह झाला होता. ती दुसऱ्यांदा गर्भवती होती आणि तिच्या तीन वर्षांची एक मुलगी आहे. मात्र, पती पवनसह सासरच्या मंडळींकडून सातत्याने कार आणि पैशांची मागणी केली जात होती. स्वयंपाक चांगला येत नाही, सासरच्या माणसांना आदर देत नाही या कारणांवरून देखील तिला मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
यापूर्वीही 2024 मध्ये आशाराणीला मारहाण करून माहेरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन झाले, पण त्रास थांबला नाही. अखेर छळाला कंटाळून आशाराणीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सोलापुरातील ही घटना वैष्णवी हगवणे प्रकरणाशी मिळती-जुळती असून, पुन्हा एकदा हुंड्याच्या प्रथेमुळे एका सूनबाईला आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेषतः दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेसोबत असा अमानुष वागणूक दिल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून, समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.