दि . २६ ( पीसीबी ) – गेल्या अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडत राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती तालुक्यात कधी नव्हे इतका पाऊस कोसळला आहे. अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गापर्यंत आले आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार सोमवारी पहाटेच या भागाच्या पाहणीसाठी बाहेर पडले आहेत. यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बारामतीत झालेल्या पावसाची भीषणता सांगितली.
मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. दौंड आणि बारामती परिसरात प्रचंड पाऊस झाला आहे. निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे. बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 14 इंच इतकी आहे. त्यापैकी 7 इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यानंतर अजित पवार हे कान्हेरी आणि काटेवाडी गावाच्या दिशेने रवाना झाले. कन्हेरी गावात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा अजित पवारांना दाखवला. अजित पवार सध्या या संपूर्ण परिसरात नुकसानीचा आढावा घेत फिरत आहेत.
बारामती तालुक्यात गेल्या 24 तासांत 87 मिलिमीटर पाऊस झाला. याठिकाणी वर्षात साधारणपणे 450 मिलिमीटर पाऊस तालुक्यात पाऊस पडतो. गेल्या 5 दिवसांत त्यापैकी 314 मिलिमीटर पाऊस पडला आहे. नीरा डावा कॅनॉल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. तसेच पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांना पाणी शिरून फटका बसला आहे.
अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आलाय. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला. या कालव्याची देखील अजित पवारांनी पाहणी केली. कालवा फुटल्याने याठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावर पाण्याखाली गेला आहे. इथं पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेलीये. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.