दि . २४ ( पीसीबी ) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता मंत्रीपदासोबतच सरकारी निवासस्थानांमध्येही मोठे बदल होऊ लागले आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा सातपुडा बंगला आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार मुंडेंना हा बंगला १५ दिवसांच्या आत रिकामा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
बंगला खाली करण्यासाठी १५ दिवसांची मुदत
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला तरीही सातपुडा बंगला त्यांच्या ताब्यातच होता. आता राज्य सरकारने नोटीसी काढून हा बंगला भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या या बंगल्याचे मुख्य गेट बंद ठेवण्यात आले असून, पोलिसांना कुणालाही आत न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २० मे रोजी छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी त्यांच्याकडे याआधीही दोनदा होती. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हे खाते रिक्त झालं होतं, त्याच जागी आता भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.