राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

0
7

दि . २३ ( पीसीबी ) – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते येत्या 36 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे कूच करणार आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी पुढील दोन ते चार दिवस गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनापट्टीवर मासेमारी करायला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.