दि . २३ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणेच्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशीलता दाखवली, असं शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे. महिला आयोगाकडे आलेल्या प्रकरणाचे 90 टक्के निकाल हा फेल ठरलेले आहेत. अकार्यक्षम चाकणकर यांना महिला आयोगावर कोणत्या निकषावर बसवलं, असा सवाल देखील अंधारे यांनी केला आहे. तसंच रूपाली ठोंबरे यांनी बाळ कुटुंबापर्यंत पोहोचवलं हे कौतुकास्पद आहे, असंही अंधारे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकरांच्या रुपालीने या प्रकरणात असंवेदनशीलता दाखवली, तरी ठोंबरेंच्या रुपालीने पुढाकार घेत वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं, हे निश्चितच प्रशंसनीय आहे. पण हे सगळं पाहिल्यावर प्रश्न निर्माण होतो की, इतकी अपयशी आणि अकार्यक्षम असलेली महिला ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या निकषाच्या आधारे नेमण्यात आली? वैष्णवी हगवणेच्या प्रकरणात तिचीच थोरली जाऊ मयूरी हगवणे हिने महिला आयोगाकडे सातत्याने तक्रार दाखल केलेली होती. मात्र यातल्या कोणत्याही तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली नाही, हे उल्लेखनीय आहे. जर तेव्हा मयूरीच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने तत्काळ घेतली असती तर वैष्णवी आज आपल्या सगळ्यांमध्ये राहिली असती, अशी खंत देखील यावेळी अंधारे यांनी व्यक्त केली आहे.