हुंडाबळी प्रकरणातील राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांना पहाटे अटक

0
7

दि . २३ ( पीसीबी ) – पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात फरार असलेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक झाली आहे. स्वारगेट परिसरात त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आले होते. परंतु त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा मिळाल्या आहेत. तसेच वैष्णवी हिच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप करुन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक केली होती. आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार होते.

राजेंद्र हगवणे हे तळेगाव येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी कैद झाले. ही घटना पिंपरी चिंचवड पोलिसांना समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. परंतु या घटनेची अधिकृत माहिती अजूनही पोलिसांनी दिली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु तिच्या आई-वडिलांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला. माध्यमांमधून हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई सुरु केली. वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली. परंतु वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पथके वाढवण्याचे आदेश दिल्याचे गुरुवारी सांगितले होते.

वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी दिली होती. त्यानंतर तिचा छळ होत असल्याचे म्हटले होते.