वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका

0
5

दि . २२ ( पीसीबी ) – “महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २२ पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आवश्यक पुरावे उपलब्ध झाले आहेत. वैष्णवीचा मृत्यू हा सामाजिक व कौटुंबिक दबावाचा परिणाम असून, ती एका अन्यायकारक व्यवस्थेची बळी ठरली, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

तिच्या पतीसह कुटुंबीयांनी केलेल्या मानसिक आणि सामाजिक छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले. तिच्या मृत्यूनंतर तिचे लहान बाळ तिसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. इतक्या कालावधीतील अत्याचारानंतरही तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू न शकणे, ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत, प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई व्हावी, आणि तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी कार्यक्षम सरकारी वकील व अधिकारी नेमावेत, अशी त्यांची विनंती आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आणि वैष्णवीच्या मुलाच्या भविष्यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. यासोबतच अशा घटना टाळण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. पोलिस विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, महिलांचे हक्क याबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सुचवले.

तसेच, आज सायंकाळी चार वाजता शिवसेना महिला आघाडीचे कांता पांढरे, मनीषा परांडे, सारिका पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बावधन पोलीस ठाण्यात भेट दिली असून, या घटनेमागील सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन पातळीवरही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाचा मागील सहा महिने ते वर्षभर काळात गंभीर छळ झाला असून, त्याची दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती असून सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून पीडितेला गप्प बसवले जात असल्याची तीव्र शक्यता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. अशा घटना रस्त्यावर नव्हे तर घराघरातल्या सामान्य मुलींनाही भेडसावत आहेत, हे लक्षात घेता, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे. कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः डॉ. गोऱ्हे यांना सांगितले, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.