- “मी त्या कुटुंबाचा मेहुणा नाही, मी आरोपींचा वकील नाही, माझं नाव या प्रकरणात उगाच का खेचलं जातं”
दि . २२ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे, आणि त्यात अजित पवार यांचं नाव ओढले जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या विवाह सोहळ्याला अजित पवार स्वतः उपस्थित होते. या विवाहात त्यांच्या हस्तेच वधू-वरांना फॉर्च्युनर गाडीची किल्ली देण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की, त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्याच्या घरातल्या लग्नाला उपस्थित राहून अप्रत्यक्षपणे हुंड्याला मान्यता दिली. मात्र यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर मला फासावर लटकवा!”
अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते त्या लग्नाला केवळ एक सामाजिक निमंत्रण म्हणून गेले होते. कोणतीही गैरकृत्ये त्यांच्या संमतीने किंवा उपस्थितीत घडली नाहीत. “मी त्या कुटुंबाचा मेहुणा नाही, आणि मी आरोपींचा वकील नाही. माझं नाव या प्रकरणात उगाच खेचलं जात आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन आपली बदनामी केली जात असल्याचा दावा करत “दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे,” असाही अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पोलिस प्रशासनाला आधीच कडक कारवाईचे निर्देश दिल्याचेही स्पष्ट केले.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पती शशांकला राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. तरीही विरोधकांचा रोख अजित पवारांवर असून, त्यांनी त्या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल आरोप केले जात आहेत. या प्रकरणात वैष्णवीच्या कुटुंबीयांनी थेट अजित पवारांकडे न्यायाची मागणी केली होती. मात्र आता त्यांनीच याविरोधात व्यक्त केलेला संताप, या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे का? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.