पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

0
6

भविष्यात देखील शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार- आयुक्त शेखर सिंह

पिंपरी, दि. १७ चिखली येथील गट क्रमांक ९० मधील इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ७ हजार २४५ चौरस मीटर भूभागावरील सुमारे ६३,९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ३६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

शहराच्या बाजूने जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याचा निर्णय हरित लवादने दिला होता. शिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यास अनुसरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चिखलीमधील या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर यांच्या अधिपत्याखाली सहशहर अभियंता संजय खाबडे, नितीन देशमुख, उपआयुक्त राजेश आगळे,सीताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, अमित पंडित, श्रीकांत कोळप, किशोर ननवरे, शीतल वाकडे, पूजा दुधनाळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, महेश वाघमोडे, नाना मोरे, कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, सुनील भागवानी, विजय सोनवणे, लक्ष्मीकांत कोल्हे, विजय वायकर, शिवराज वाडकर, सुनीलदत्त नरोटे यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार, बापूसाहेब बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी, राजेंद्रसिंह गौर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आयुक्त सिंह यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कारवाईचा आढावा घेतला. सकाळी सहानंतर कारवाईला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेला संपलेल्या या कारवाईमध्ये ३६ इमारतवजा बंगले निष्कासित करण्यात आले आहेत.

गट क्रमांक ९० मधील अनधिकृत बांधकाम निष्कानाच्या कारवाईमध्ये सहभागी यंत्रणा

अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ७ कार्यकारी अभियंते, २२ उपअभियंते, २२ कनिष्ठ अभियंते, २२ बीट निरीक्षक, १६८ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, ४०० पोलीस आणि १२० मजूर कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. १५ पोकलेन, ३ जेसीबी यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय २ अग्निशमन वाहने आणि ४ रुग्णवाहिका याठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

चिखली गट नंबर ९० मध्ये निळ्या पूररेषेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. नागरिकांनी पिंपरी चिंचवड शहरात घर, बंगला, जमीन खरेदी करताना अशा मालमत्तांच्या सर्व शासकीय परवानग्या तसेच आरक्षणे अथवा पुररेषेसारख्या तत्सम बाबी तपासून घेणे आवश्यक आहे. कोणीही अनधिकृतपणे बांधकाम करू नये. यापुढेही शहरातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.