- शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांची मागणी
- शिवसेना आक्रमक ; जिल्ह्यातील महिला कामगारांच्या सुरक्षेकडे वेधले लक्ष
- एमआयडीसी भागात महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांसाठी उद्योगमंत्र्यांना पत्र
पिंपरी, दि. 16
चाकण येथील मेदनकरवाडी भागामध्ये कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तीच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहा वाजता घडली. या पिडीतेला न्याय मिळावा आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी.यासाठी फास्टट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्यात यावा.तसेच एमआयडीसी भागातील महिला कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने योग्य सुरक्षा पुरवाव्यात. यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्योगमंत्री, पोलीस प्रशासनाला पत्र देत याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांनी केली आहे.
याबाबत सुलभा उबाळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, शहर प्रमुख सरिता साने उपस्थित होत्या. दिलेल्या निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे. पीडित महिला नाईट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. या दरम्यान अज्ञात इसमाने तिचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हा प्रश्न आता केवळ चाकण एमआयडीसी पुरता मर्यादित राहिलेला नाही. पुणे जिल्हयामध्ये कार्यरत असणाऱ्या सपूर्ण औद्योगीक क्षेत्रामध्ये महिलांना सुरक्षा प्राधान्य करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.त्याअंतर्गत संपूर्ण कंपन्यांमध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी कंपनीतर्फे गाडी व सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे. तसेच ज्या महिला नाईट शिफ्टमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियमावली करणे गरजेचे आहे असे देखील सुलभा उबाळे, गीतांजली ढोणे यांनी म्हटले आहे.
फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवा
दरम्यान चाकण येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. या भागामध्ये अनेक कंपन्यांमध्ये महिला काम करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या भागामध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न आहेच शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आहे त्यामुळे यामध्ये ठोस कार्यवाही व्हावी.
पुणे जिल्हयातील विविध औद्योगिक आस्थापना, लघुउद्योग या सर्वांसोबत पोलीस प्रशासन यांची बैठक घेतली जावी. हे प्रकरण संवेदनशील असल्याने तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करावा आणि पीडितेला न्याय द्यावा असे सुलभा उबाळे, गीतांजली ढोणे यांनी म्हटले आहे.
शिवसेना पीडित महिलेच्या पाठीशी
सुलभा उबाळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये चाकण घटनेतील पीडित महिलेची भेट घेतली.या महिलेच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे, सरिता साने शिल्पा अनपण उपस्थित होत्या.










































