उत्तम जानकर, डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची नाक घासून माफी मागावी

0
6

मुंबई, दि . १४ ( पीसीबी ) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे. त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी यांनी बैठकीत अशी कुठलाही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत आमच्या पक्षाच्या काही अटी व शर्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय आमच्या बैठकीत नव्हता. तसेच, दोन पक्ष एकत्र येण्याच्या बातम्या पेरण्यात आल्या असून त्यात तथ्य नाही. मात्र, जर दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शती आहेत, असे म्हणत त्यांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युलाच एकप्रकारे सांगितला आहे. त्यामध्ये, अजित पवारांवर विखारी टीका करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरी यांनी घातली आहे.

अजितदादांवर ज्यांनी निवडणुकीत विखारी टीका केली, त्यांनी नाक घासून दादांची माफी मागावी, त्यानंतरच दादांनी एकत्रिकरणाबाबत चर्चा करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली. तसेच, टोकाची भाषणं करणाऱ्यांमध्ये पहिला नंबर उत्तमराव जानकर तर दुसरा नंबर अमोल कोल्हेंचा आहे, यांना लाज, लज्जा, शरम वाटत असेल तर माफी मागून पापक्षालन करावं, अशा शब्दात अमोल मिटकरींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्रिकरणाच्या चर्चेवर अटी व शर्तींसह भाष्य केलं आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार सांगतील तेच धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदार व प्रमुख नेत्यांची बैठक झाली, या बैठकीला आमदार अमोल मिटकरीही मुंबई येथे उपस्थित होते. दरम्यान, पक्षाच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेर जात असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई करावी. पक्षातील बैठकीत न झालेल्या चर्चांच्या खोट्या बातम्या बाहेर पेरणाऱ्या सूत्रांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी आपण अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचेही आमदार मिटकरी यांनी सांगितले.