‘मराठी माणसाने व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावीत!’ – अमित गोरखे

0
6

कमोडिटी मार्केटिंग कार्यशाळा संपन्न
पिंपरी, दि. 14 ‘मराठी माणसाने व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावीत!’ असे विचार आमदार अमित गोरखे यांनी सिझन्स बँक्वेट हॉल, यमुनानगर, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक १२ मे २०२५ रोजी व्यक्त केले. विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कमोडिटी मार्केटिंग कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित गोरखे बोलत होते. विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटरचे संचालक विराज जमदाडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

कमोडिटी एक्सलन्स कार्यशाळेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध भागांतून वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे १५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आणि महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.

अमित गोरखे म्हणाले की, ‘मराठी माणूस फारसा व्यवसायाकडे वळत नाही; परंतु विराज जमदाडे यांच्यासारखा उच्चशिक्षित मराठी तरुण विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटरच्या माध्यमातून कमोडिटी मार्केटिंगबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे!’ असे गौरवोद्गार काढून अमित गोरखे पुढे म्हणाले की, ‘या क्षेत्रात अभ्यास, सातत्य आणि एखाद्या अपयशाने घाबरून न जाण्याची गरज असते. प्रशिक्षणातून या गोष्टी साध्य होतात!’ विराज जमदाडे यांनी, ‘कमोडिटी मार्केटिंग हा आधुनिक काळात महत्त्वाचा व्यवसाय असून संगणकाच्या साहाय्याने घरात बसून आपण तो करू शकतो. सोने, चांदी यासारखे मौल्यवान धातू, खनिज तेल आणि अनेक वस्तूंची खरेदी – विक्री करून त्यातून नियमितपणे आर्थिक लाभ मिळवता येतो. अर्थातच त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज असते. कार्यशाळेत मोठ्या पडद्यावर खरेदी – विक्री आणि तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात येते. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळांचे विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटरच्या वतीने यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. ही अठरावी कार्यशाळा असून त्यालादेखील उत्तम प्रतिसाद लाभला आहे!’ अशी माहिती दिली.