पिंपरी, दि. १० – पिंपरी चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या नगर नियोजन योजना अर्थात टीपी स्किमला विरोध कऱण्यासाठी कुदळावाडी पाठोपाठ आता चऱ्होली ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्या म्हणजे रविवार (११ मे) सकाळी १० वाजता विठ्ठल मंदिरात सर्व गावकऱ्यांची बैठक होणार आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कुदळवाडी येथे ३८० हेक्टर ची एक आणि चऱ्होली येथे १४२५ हेक्टरच्या पाच अशा एकूण सहा टीपी स्किमचा इरादा महापालिका प्रशासनाने जाहीर केला. २४ एप्रिल रोजी त्याबाबत आयुक्तांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेत निर्णय कऱण्यात आला आणि ३० एप्रिल रोजी त्याबाबत वर्तमानपत्रांत प्रगटन देण्यात आले.
सर्व टीपी योजनांबांबत अत्यंत गोपनियता राखण्यात आली. निर्णय केल्याचे आपल्यालाही माहित नसल्याचे खुद्द आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त त्या काळात पॅरीस दौऱ्यावर असल्याने खुलासा झाला नाही. पीसीबी टुडे न्यूज पोर्टलने या प्रकरणावर सरिविस्तर तीन व्हिडीओ, ग्रामस्थांच्या मुलाखती आणि तज्ञांचे मार्गदर्शन असलेल्या मुलाखती प्रसारीत केल्या. टीपी स्किम म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे-तोटे याबाबत नागरिकांच्या मनातील शंकाकुशंकाचा खुलासा त्यातून झाला.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी कुदळवाडी परिसरातील ४५०० अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई केली आणि सुमारे ९०० एकर क्षेत्र मोकळे कऱण्यात आले. भंगारमालासह, ८०० वर लघुउद्योजकांचे वर्कशॉपस्, अनेक गोदामे त्या कारवाईत भुईसपाट कऱण्यात आली. लाखो बेरोजगार झाले आणि कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. आमदार लांडगे यांनी ही कारवाई बांगलादेशी घुसखोरांसाठी केल्याचे वारंवार ठासून सांगितले होते. प्रत्यक्षात तीन महिन्यांत एकही बांगलादेशी किंवा घुसखोर सापडला नाही. आता नेमकी ३८० हेक्टर म्हणजेच ९५० एकरावर टीपी स्किमचा इरादा जाहीर करण्यात आल्याने, ती कारवाई बांगलादेशी घुसखोरांसाठी नव्हे तर टीपी स्किमसाठीच होती, असा आरोप करण्यात आला.
आमदार लांडगे यांनी सावध पवित्रा घेत आपली भूमिका जाहीर करताना, आपल्याला टीपी स्किमबाबत माहित नाही, ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीच योजना राबवता येणार नाही, असे स्पष्ट केले. कुदळवाडी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ आमदार लांडगे आणि आयुक्त यांना शुक्रवारी भेटले तेव्हा टीपी स्किम रद्द करण्याचे आश्वासन मिळाले.