पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू

0
6

दि . १० ( पीसीबी ) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत जात असून पाकिस्तानकडून भारताविरोधी कुरापती सुरूच आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिलं जात असताना भारतातील अनेक नागरिकांना यामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे, राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा शहीद झाले आहेत. यासह दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानने शनिवारी पहाटेच जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानने तोफगोळा डागला. या तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने राज कुमार थापा गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह दोन नागरिकही जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

परंतु, तिथे राज कुमार थापा आणि दोन नागरिकांना यांना मृत घोषित करण्यात आलं.

राज कुमार थापा यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजौरीमधून अत्यंत वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवेतील एक चांगला अधिकारी आपण गमावला. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांबरोबर काल दिवसभर होते. पण आज त्यांच्या निवासस्थानावर पाकिस्तानने लक्ष्य केलं. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला. यावेळी दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत”, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.