पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ आढळले जुने बॉम्ब शेल; परिसरात भीतीचं वातावरण

0
4

दि . १० ( पीसीबी ) – भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणात पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगार दुकानात दोन जुने बॉम्ब शेल (Bomb Shells) आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब नाशक पथकाची तत्काळ कारवाई :

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी भंगार दुकानात संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती दिल्यानंतर, पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कसून तपासणी केल्यानंतर हे जुने आणि कमी तीव्रतेचे बॉम्ब शेल असल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले. तरीही, ते संरक्षण दलाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी संबंधित दुकानाच्या मालकाची चौकशी सुरू केली असून, ही शेल्स कुठून आल्या, त्यांचा स्त्रोत काय आहे याचा शोध घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सतर्कता वाढवली असून, रेल्वे स्थानकावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पिंपरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शंकेचे वातावरण न पसरवता सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे. (Pimpri Railway Station Bomb)

दुसरीकडे, पाकिस्तानकडून सतत ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले सुरु आहेत. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळासह अनेक लष्करी ठिकाणी स्फोट घडवून मोठं नुकसान केलं आहे. राजस्थान, गुजरात आदी सीमाभागात पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचे अवशेषही सापडले आहेत.