‘गांधीजी हे अद्भुत गारुड!’ – डाॅ. विश्वंभर चौधरी

0
6

शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प पहिले
पिंपरी, दि. दि . ८ ( पीसीबी ) ‘लौकिकार्थाने आकर्षक व्यक्तिमत्त्व नसतानाही आपल्या नैतिक आचरणाने भारून टाकणारे गांधीजी हे अद्भुत गारुड होते!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी बुधवार, दिनांक ०७ मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी : सत्य – अहिंसेचे पुजारी’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना डाॅ. विश्वंभर चौधरी बोलत होते. गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. बी. आर. माडगूळकर अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, दत्ता धामणस्कर, प्रा. अनिल पावटे, दत्ता गायकवाड, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन आणि शिवाजीमहाराज, महात्मा फुले, डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून मारुती भापकर यांनी पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप २८ नागरिकांना श्रद्धांजली वाहून, ‘नागरिकांना महापुरुषांच्या विचारांचा वारसा जावा या उद्देशातून पंचवीस वर्षांहून अधिक काळ शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. आमचे पक्ष, संघटना, विचारधारा वेगवेगळ्या असतील, वैचारिक मतभेद असतील मात्र पहलगाम येथील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून जी कारवाई आमच्या शूरवीर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करून केली. अशा विशिष्ट परिस्थितीत आम्ही सर्व भारतीय एक आहोत, या भावनेने केंद्र सरकार व भारतीय सैनिकांबरोबर ठामपणे उभे राहणार!’ अशी भूमिका भापकर यांनी मांडली.
प्रा. बी. आर. माडगूळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आपल्या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश आले असून लवकरच त्याची उभारणी केली जाईल. आताच्या काळात पर्यायी इतिहास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी गांधीजींचे विचार कधीही पुसले जाणार नाहीत!’ असे मत व्यक्त केले.

डाॅ. विश्वंभर चौधरी पुढे म्हणाले की, ‘या जगात विज्ञानाला कधीही धर्म नव्हता; मात्र दहशतवादाला धर्मच कारणीभूत असतो. पाकिस्तानवर कारवाई करणे गरजेचे होते; परंतु त्यामुळे युद्धज्वर वाढू नये एवढेच वाटते. गांधी राष्ट्रपिता आहेत की नाही याचा काही लोकांना प्रश्न पडतो; परंतु विदेशात गांधींच्या देशातून आलो आहोत, हीच ओळख सांगावी लागते. दुर्दैवाने गांधी आणि आंबेडकर यांच्यात समन्वय साधण्यात आम्ही कमी पडलो. कर्मठ कुटुंबातून आलेले गांधी हे हिंदू आहेत. प्रारंभीच्या काळात ते चातुर्वर्ण्य मानत असत; परंतु पुढे त्यांच्या विचारात आमूलाग्र बदल घडत गेला. गांधींनी देवळातून हिंदुधर्म समाजात आणला; आणि त्याचवेळी त्यातील ब्राह्मण्य वजा केले. गांधी आणि जिना एकाच प्रांतातील होते. जिना यांचे आजोबा हिंदू होते; पण त्यांना धर्मातून बहिष्कृत करण्यात आले होते. प्रारंभी नास्तिक असलेले जिना कालांतराने कट्टर मुस्लीम झाले; तर कर्मठ गांधी सहिष्णू झाले. १८८३ मध्ये गांधी आफ्रिकेत गेले. वकिली करावी असा त्यांचा मनोदय होता. एका रेल्वेप्रवासात भारतीय म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले. त्यातून त्यांच्या सत्याग्रहाचा अन् निर्भयतेचा प्रारंभ झाला. आफ्रिकेतून बावीस वर्षांनंतर वकिली करण्यासाठी गांधी भारतात परत आले. पहिल्याच खटल्यात बॅरिस्टर सरदार पटेल यांच्यापुढे ते अगदीच निष्प्रभ ठरले; परंतु सहा महिन्यांतच आपल्या नैतिक आचरणातून ते सरदार पटेल यांचे नेते झाले. नामदार गोखले यांच्या आज्ञेनुसार त्यांनी संपूर्ण भारतभर पायी भ्रमण केले. १९२० पासून देशात गांधीयुग सुरू झाले; आणि १९४८ मध्ये बंदुकीच्या गोळीने संपले. गांधी यांचे गुरू, पहिला चेला आणि त्यांची हत्या करणारा हे तीनही ब्राह्मण होते, ही एक विलक्षण बाब आहे. गांधींनी आपल्या कारकिर्दीत फक्त तीन आंदोलने आणि दोन उपोषणे केलीत; आणि उर्वरित कार्यकाळात संघटनेची बांधणी केली. सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. बुद्ध, कबीर यांची अहिंसा त्यांनी अंगीकारली; मात्र आता त्याची खिल्ली उडवली जाते. गांधींचे असंख्य टीकाकार आहेत; तसेच त्यांच्यावर अनेक आक्षेप घेतले जातात; पण त्यांचे हेतू कधीही वाईट नव्हते. गांधी केवळ राष्ट्रपिताच नव्हते; तर एक जगन्मान्य नेताही होते. आजन्म विद्यार्थी राहिलेला हा नेता होता. लहान मुलांशी आणि एखाद्या व्हॉईसरॉयशीही ते अगदी सहजपणे संवाद साधू शकत. हा देश गांधी, पटेल, नेहरू यांच्या स्वप्नातील सहिष्णू भारत व्हावा अशी आमची भूमिका आहे. सरकारला वैचारिक विरोध असला तरी महत्त्वाच्या प्रसंगी पाठिंबा राहील!’
बॅरिस्टर नेहरू, मौलाना आझाद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, नामदार गोखले, विनोबा भावे, सुभाषचंद्र बोस असे अनेक संदर्भ उद्धृत करीत डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी विषयाची मांडणी केली.

जयभवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पवार यांनी आभार मानले.