पिंपरी, दि. ६ ( पीसीबी ) – लोणावळा शहरात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाळ्यात पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिक, पर्यटकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पावसाळापूर्व कामाला गती द्यावी. नालेसफाई पूर्ण करावी. वाहनतळ विकसित करावे. भूशी डॅमकडे जाणा-या रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरपरिषदेच्या अधिका-यांना दिल्या.
लोणावळा शहरातील विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना महिला संघटीका मनिषा भांगरे,आरपीआयचे पच्छिम महाराष्ट्र नेते सूर्यकांत वाघमारे, लोणावळा नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवासेना तालुका प्रमुख विशाल हेलावळे, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, नाजीर शेख, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, शिवसेना उपशहर प्रमुख विशाल पठारे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी, कल्पनाताई आखाडे, मनसे शहर प्रमुख निखिल भोसले, प्रकाश पठारे, मंगेश येवले, विजय आखाडे, सुनिल तावरे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, लोणावळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शहरात कोठेही पाणी साचून राहता कामा नये. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करावी. पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटकांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये. पर्यटकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करावी. भूशी डॅमकडे जाणारा रस्त्याकडे सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. वाहनतळासाठी जागेचे भूसंपादन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. सद्यस्थिती ४० टक्के काम झाले आहे. तीन कोटी १४ लाख रुपयांचे हे काम आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये मल्टीपर्पज वाहनतळ विकसित करावे. त्यासाठी नगरविकास विभागाकडून मदत केली जाईल. वल्हवन तलावाचे सुशोभीकरण करावे. खंडाळा येथील उद्यानाच्या कामाला गती द्यावी. पर्यटकांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी. त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन करावे. पोल क्रमांक ३०, ३२ येथे रेल्वे दोन पूल उभारणार आहे. त्यासाठी तत्काळ जागेचे भूसंपादन करावे. दोन महिन्यात जागेचे भूसंपादन झाले पाहिजे. लोणावळ्यातून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करावी. नदीतील पाण्यावरील जलपर्णी बाहेर काढावी. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफ करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती १५ दिवसात लेखी स्वरुपात देण्याचे निर्देशही खासदार बारणे यांनी दिले.