दि. 6 ( पीसीबी ) –पिंपळे-निलख येथील स्मशानभूमीजवळ मुळा नदीपात्रात राडारोड्याचा भराव टाकून अतिक्रमण केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. जलसंपदा विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. नदीत केलेले अतिक्रमण आणि त्या अनुषंगाने टाकलेला राडारोडा स्वखर्चाने काढून नदी प्रवाहित करावी, अन्यथा याबाबत आपल्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागातील अभियांत्रिकी विभागाला दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत मुळा नदीकाठी काम सुरू केले आहे. त्या माध्यमातून नदीकाठावरील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत. नदीमध्ये राडारोडा टाकून भराव करण्यात आला आहे. या राड्यारोड्यामुळे आणि नदीपात्रात काँक्रिटीकरण सुरू केल्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. नदीकाठावरील वन्यप्राणी, पक्षी यांचा अधिवास संपुष्टात आला आहे.
नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. आम्हाला नदी काठचे सुशोभीकरण नको, आम्हाला नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवी, असा नारा देत पुणे आणि पिंपरी-चिंचवड नदी पुनरुज्जीवन समितीने दिला आहे. या प्रश्नासाठी नदी बचाव कृती समिती आणि विविध ११० सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लढा उभा केला आहे.
नदी वाचविण्यासाठी हजारो पर्यावरणप्रेमींनी पिंपळे निलख येथे मुळा नदीकाठावर उभे ठाकले आहेत. नदी सुधार प्रकल्पाच्या कामाच्या विरोधात रविवारी (दि.२७ ) एप्रिलला जनआंदोलन करून नदी सुधार प्रकल्पाला विरोध केला. नदी वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट कार्ड पाठवून वृक्षतोड थांबवा, नदी स्वच्छ करा, नदी वाचवा यासाठी विनंती केली आहे.
अन्यथा महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ व २०१८ च्या परिपत्रकाचा हवाला देत विभागाने संबंधितांना तत्काळ अतिक्रमण हटवून नदीपात्र पूर्ववत करण्याचा आदेश दिला आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सहायक अभियंता श्रेणी १, खडकवासला कालवा विभाग रा. बा. गव्हाणकर यांनी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. याबाबत पर्यावरण कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
नदी प्रवाहित करण्याची मागणी
नदीमध्ये राडारोडा भराव टाकून ती अरुंद करण्याचा डाव महापालिका प्रशासनाने केला आहे. तसेच नदीचा प्रवाह थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. नदी परिसरात वास्तव्य करणाऱ्या पशुपक्षी यांचा अधिवास नष्ट करण्यात आला आहे. शेकडो झाडांची तोडणी केली आहे. याचा विपरीत परिणाम निसर्गावर होणार आहे. त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. हा धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका नदी पुनरुज्जीवन समिती, नदी बचाव कृती समितीने विविध विभागांसोबत पत्र व्यवहार केला आहे. नदीत राडारोडा टाकून जो भराव टाकला आहे तो स्वखर्चाने काढून घ्या. नदी प्रवाहीत करा नदीक्षेत्रातील अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. संभाव्य पूरस्थितीला आमंत्रण मिळू शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.