भोसरीच्या शाळेततब्बल ३६ वर्षांनंतर भरला आठवणींचा वर्ग

0
4

पिंपरी : तब्बल ३६ वर्षांनंतर आठवणींचा वर्ग भरला, तो आम्हां जणू स्वर्गसमान भासला, अशा भावना भोसरीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते स्नेहमेळाव्याचे !

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पहिले माध्यमिक विद्यालय अशी भोसरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालय अशी ओळख आहे. या शाळेतील दहावीच्या १९८८-८९ बॅचच्या विद्यार्थ्यांनी संतनगर येथील पर्ल बँक्वेट हॉलमध्ये आयोजन केले होते. तत्कालिन मुख्याध्यापक विष्णू फुगे, शिक्षक उस्मान तांबोळी, गंगाराम दसगुडे, जनार्दन साळुंखे, प्रकाश कोल्हे, बाळासाहेब पाटील, सुधीर कुलकर्णी, नलिनी गायकवाड, शुभदा पुंडलिक, हेमा वैशंपायन, पुष्पा वाघ उपस्थित होते.

वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षीही हाती काठी घेऊन फुगे सरांनी उपस्थिती दर्शवून सर्वांना चकीत केले. त्यांचे आणि सर्व शिक्षकांचे स्वागत विद्यार्थ्यांनी दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या घालून केले. त्यानंतर व्यासपीठावर सर्वांचे औक्षण करून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीत सादर केले.

मुलामुलींचे चेहरे फारसे आठवत नाहीत. मात्र, त्यांच्यातील खोडकरपणा, हुशारी आठवते. काही मुले वर्गात बॅकबेंचर होते. मात्र, व्यवसायात आज अग्रेसर आहेत. या सर्वांनी शाळेच्या त्यांच्याच आठवणींना नाही तर आमच्यादेखील आठवणींना उजाळा दिला आहे. आधुनिक साधनांची कमतरता असताना विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केल्याचे पाहून समाधान वाटते, अशा प्रातिनिधीक भावना वैशंपायन आणि तांबोळी यांनी व्यक्त केल्या.

व्याख्याते गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते देव आणि भक्तासमान आहे. त्यांच्यातील जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी विसरणे अशक्य आहे. जीवनाचे सुंदर आणि सफल तत्वज्ञान शिक्षकांकडूनच शिकायला मिळते. त्याचा उपयोग आयुष्यभर होतो. नकारात्मक बाबींना महत्त्व न देता सकारात्मक बाबीची रेषा मोठी केली की यश निश्चित मिळते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी सावंत यांनी केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता लांडगे यांनी आभार मानले. मेळाव्याच्या संयोजनासाठी विठ्ठल माने, कैलास रसाळ, नंदू लोंढे, रामदास हुले, किशोर कोर्टीकर, शब्बीर तांबोळी, संजय दळवी, सुरेश वाघमोडे, सुधीर कराळे, कल्पना सुतार, सुनंदा तरडे, तेजस्विनी पारखे यांनी पुढाकार घेतला.